मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक झालेल्या दिल्ली दौऱ्याची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असताना एकनाथ शिंदे दिल्लीत रवाना झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. त्यांच्या या दौऱ्यामागचं नेमकं कारण काय? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विरोधकांनीही याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली. ”मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे स्वत:चा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यासही तयार आहेत,” असा दावा त्यांनी केला होता. आता संजय राऊत यांना शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी थेट इशारा दिला आहे.
अर्जुन खोतकर म्हणाले की, संजय राऊत यांना एकनाथ शिंदे हे कळलेलेच नाहीत. संजय राऊत यांना कोणी विसर्जित केले? एकनाथ शिंदेंनी तुम्हाला विसर्जित केले आहे. तुमच्या सगळ्यांची वाट लावलेली आहे. त्यामुळे ते असे बोलणार नाही तर काय बोलणार? संजय राऊत यांनी आता वायफळ बडबड बंद करावी. नाहीतर त्यांना वेगळ्या पद्धतीने तोंड द्यावे लागेल, असा इशारा त्यांनी संजय राऊत यांना दिला आहे.
संजय राऊत एकनाथ शिंदेंमुळेच खासदार
एकनाथ शिंदे यांच्यामुळेच ते आज खासदार आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे. आमच्या उपकारांची परतफेड अशी नसते. संजय राऊत आज खासदार आहेत ते फक्त एकनाथ शिंदे यांच्यामुळेच आहेत. संजय राऊत सांगणारे कोण आहेत? त्यांना कोणी अधिकार दिला, असा हल्लबोल अर्जुन खोतकर यांनी संजय राऊत यांच्यावर केलाय.
नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत? संजय राऊत म्हणाले होते की, शिंदे गुरुपौर्णिमेनिमित्त दिल्लीला गेले होते. त्यांच्या या दौऱ्याचं कारणही मी अगोदरच सांगितलं होतं, आणि मी जे बोलतो ती माहिती अधिकृत असते. दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ‘गुरू’ मानत त्यांची पूजा केली. त्यांच्या चरणांवर डोकं ठेवून चाफ्याची फुले वाहिली. यानंतर त्यांनी तिथे इतर नेत्यांचीही भेट घेतली. पण याच दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी नाराजी व्यक्त करत तक्रार केली, असा आरोप राऊतांनी केला. शिंदेंनी अमित शाह यांच्याकडे तक्रार केली की, देवेंद्र फडणवीस आमची कोंडी करत आहेत, काम करू देत नाहीत, आमदारांच्या चौकशा लावत आहेत आणि आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी म्हटले होते. तर मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे स्वत:चा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यासही तयार आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला होता.
