Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सुत्रीचा वापर आणि हिंदी सक्तीला मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडाडून विरोध केला होता. मनसेकडून आणि ठाकरे गटाकडून 5 जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, शासनाने निर्णय मागे घेतल्यानंतर मोर्चा रद्द करण्यात आला. यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र विजयी मेळावा साजरा केला. दरम्यान, मनसे आणि ठाकरे गटाने मोर्चाची घोषणा करताच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला होता. आता ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना डिवचले आहे. आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे हिंदी भाषा सेलचे राज्य प्रमुख पारसनाथ तिवारी यांनी गुणरत्न सदावर्तेंची भेट घेतली. यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.

गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, देशातील चळवळी विचारांवर उभ्या राहतात. देशाची भाषा हिंदी आहे. पण भाषेच्या नावावर कापाकापी करू नये, त्यांना घरात बसवा. डॉक्टर पारसनाथ तिवारी आणि इतर विद्वानांनी माझा सन्मान केला आणि यापुढे या राज्यात तिसरी भाषा शिकली जाणारच आहे. हिंदी भाषा देशाची प्रिय भाषा आहे. कोकणात हिंदी भाषिक काम करतात. उद्धव आरशात पाहा, विनय शुक्ला हिंदी भाषेतील शिक्षक आहेत. ते कुणाला शिकवतात हे त्यांनी सांगावं, असे त्यांनी म्हटले.

ठाकरे बंधूंविरोधात याचिका दाखल करणार

गुणरत्न सदावर्ते पुढे म्हणाले, देशाला तोडणाऱ्यांनी ऐका, राज्यात 2 कोटी लोक हिंदी भाषिक आहेत. 7 कोटी बहुभाषिक होण्यास इच्छूक आहेत. 2 कोटी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसारखे आहेत. राज ठाकरे लक्ष द्या, मालदिवमध्ये हिंदी भाषा अनिवार्य आहे. राज ठाकरेंच्या विचाराला पूर्ण विराम मिळाला आहे. तिसरी भाषा अनिवार्य केलीच पाहिजे. सरकारने शासन निर्णय पुन्हा लागू करावा. ठाकरे बंधूंच्या विरोधात पुढच्या आठवड्यात कोर्टात याचिका दाखल करणार आहे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. हिंदीचा इतका तिरस्कार असेल तर उद्धव ठाकरे दोपहरचा सामना बंद करा, असे देखील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले.

गुणरत्न सदावर्ते आधूनिक अबाहम लिंकन : पारसनाथ तिवारी पारसनाथ तिवारी म्हणाले की, महाराष्ट्र संतांची भूमी आहे. यात गुणरत्न सदावर्ते भारतीय संविधानाचं रक्षण करत आहे. हिंदी विरोधात राजकारण करणाऱ्यांविरोधात त्यांनी जी भूमिका घेतली, तशीच भूमिका गुणरत्न सदावर्ते घेत आहेत. गुणरत्न सदावर्ते हे आधूनिक अबाहम लिंकन आहेत. जीवाची पर्वा न करता ते लढत आहेत. राज्यात मराठी सक्तीची आहेच पण हिंदीचाही अपमान होता कामा नये, असे त्यांनी यावेळी म्हटले.