Spread the love

रायगड / महान कार्य वृत्तसेवा

रायगड जिल्ह्यातील छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीशी निगडित असलेल्या छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव अखेर बदलणार आहे. आता ही ग्रामपंचायत ‘किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत’ म्हणून ओळखली जाणार आहे. ग्रामस्थांनी ग्रामसभा घेत याला मान्यता दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या नावबदलाची मागणी होती. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा रायगडाच्या दौऱ्यात हा मुद्दा जोरदार उपस्थित केला होता, तर स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी यास पाठिंबा दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात पत्र सादर करण्यात आले होते.

छत्री निजामपूर, वाघेरी आणि रायगड वाडी या तीन महसुली गावांची विशेष ग्रामसभा पार पडली. यात एकमताने नामांतराविषयी निर्णय घेण्यात आला.छत्री निजामपूर ग्रुप ग्रामपंचायतीचे नाव बदलून ‘किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत’ करावे अशी मागणी सर्वानुमते करण्यात आली आहे

या निर्णयाचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. मात्र, ग्रामपंचायत कार्यालय छत्री निजामपूरमध्येच राहावे, अशी आग्रही मागणीही ग्रामसभेत ग्रामस्थांनी केली आहे. गोपीचंद पडळकर यांच्याकडून प्रथम नामांतराचा मुद्दा चर्चेत आणला गेला होता.

स्वराज्याच्या राजधानी असलेल्या किल्ले रायगड परिसरातील छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचा मुद्दा आता चांगलाच चर्चेत आला होता. सत्ताधारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीच हा मुद्दा उपस्थित करून निजामाच्या खुणा पवित्र रायगडची ओळख सांगत असतील तर ते आपले दुर्दैव असं म्हटलं होतं. किल्ले रायगड ज्या ग्रामपंचायत हद्दीत येते त्या छत्री निजामपूर या ग्रामपंचायतीचे नाव रायगडवाडी करा अशी मागणी पडळकर यांनी केली होती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी देखील नाव बदलण्यास समर्थन दिलं होतं.

राज्यात भाजप सरकार आल्यानंतर अनेक जिल्ह्यांच्या नामांतरं करण्यात आली आहेत. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव, अहमदनगरचे अहिल्यानगर करण्यात आलं होतं. किल्ले रायगड ज्या ग्रामंपचायतीच्या हद्दीत येतो त्याचं नाव छत्री निजामूपर ऐवजी रायगडवाडी करा अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केल्यानंतर स्थानिकांनी देखील नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.