छत्रपती संभाजीनगर / महान कार्य वृत्तसेवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यापीठाच्या उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानं एकच खळबळ उडालीय. विशेष म्हणजे त्यांनी लिहिलेल्या पत्रात कुलगुरू आणि कुलसचिव त्रास देत असल्याचं नमूद केल्यानं तो चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या हेमलता यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आलेत. यापूर्वीही डॉ. हेमलता ठाकरे यांनी आपली तक्रार मांडली होती, त्यांच्या आरोपांची चौकशी सुरू असल्याचं स्पष्टीकरण कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिलंय.
डॉ. हेमलता ठाकरेंचा आत्महत्येचा प्रयत्न : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उपकुलसचिव डॉ. हेमलता ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यांचा मुलगा व्यंकटेश याने दिलेल्या माहितीनुसार हेमलता या बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत काम करून घरी परतल्या होत्या. त्यानंतर त्या त्यांच्या खोलीत गेल्या, चहा पिण्याबाबत त्यांना आवाज दिला असता त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर त्यांच्या खोलीत जात त्यांना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या प्रतिसाद देत नसल्याने त्या बेशुद्ध झाल्याचं निदर्शनास आले. लगेच रुग्णवाहिका बोलावून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. खोलीमध्ये उशीखाली एक चिठ्ठी आणि गोळ्यांचे पाकीट आढळून आलंय. त्यामध्ये कुलगुरू विजय फुलारी आणि कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर त्रास देत असल्याचं नमूद केलंय.
आधीही केली होती तक्रार : या आधी काही दिवसांपूर्वी उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी आपल्याला मुद्दाम त्रास देत असल्याची तक्रार केली होती. चतुर्थ श्रेणी कर्मचारी मुद्दाम दिला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू आहे. दरम्यान, बेगमपुरा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली, बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. परंतु त्याची चौकशी पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिली. तर त्यांनी याआधीही असे आरोप केले होते, त्याची चौकशी सुरू असल्याच स्पष्टीकरण देण्यात आलं.
