Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकार गुरूवारी जनसुरक्षा विधेयक दोन्ही सभागृहात मांडणार आहे. सार्वजनिक जनसुरक्षा विधेयकावर चर्चा करण्यासाठी दोन्ही सभागृहांच्या सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना करण्यात आलं होतं. या समितीचे अध्यक्ष म्हणून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गुरूवारी दोन्ही सभागृहात या समितीचा अहवाल सादर करणार आहेत. या विधेयकाबाबत विरोधी पक्षातून काहीशा संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

सरकार जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतय : ”असं विधेयक आम्हाला मंजूर नाही. सरकार जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. रस्त्यांवर कोणी उतरत नाही. पोलीस आधीच लोकांना मारत आहेत. ह्या विधेयकानंतर आणखी बेलगाम होतील. विरोधकांनी टीका केली, रस्त्यावर उतरले तर तुरुंगात टाकतील. असं बिल आणण्याची गरज नाही आहे. ताडामध्ये लोकांना पकडण्यात आलं. एक एफआयआर झाला तर ती केस लढावी लागते. पोलीस गुन्हे मागे घेत नाहीत. आम्ही या विधेयकाला विरोध करु. असं बिल आणण्याची गरज नाही. आधीच अनेक कायदे आहेत, अशात हे बिल कशाला? हा सत्ता पक्षाचा अहंकार आहे,” अशी प्रतिक्रिया जनसुरक्षा विधेयकाबाबत समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी दिली.

सरकार कोणत्याही मुद्द्‌‍यावर चर्चा करणार नाही : ”आज एक बैठक आहे. त्यात अधिवेशन कसं चालणार हे ठरतं. पण, सरकार शनिवारपर्यंत अधिवेशन करणार असं चर्चेत आहे. हे विधेयक गुरूवारी किंवा शुक्रवारी येऊ शकतं. कोणाला अडचण येणार असेल तर आम्ही विरोध करू. खरं तर अधिवेशन 18 पेक्षा पुढं जायला पाहिजे होतं. पण ते 11 पर्यंत येऊ नये ही अपेक्षा. हे शासन गंभीर नाही. कर्जमाफीची योग्यवेळ कधी येणार? आणखी मोठ्या संख्येनं शेतकरी आत्महत्या होतील तेव्हाच येणार का? लाडक्या बहिणींना 500 रुपये वाढवून देणार होते. त्याच काय झालं? या सर्व प्रश्नांना उत्तर देताना सरकारची मोठी अडचण होते. त्यामुळंच अधिवेशन 18 वरुन 11 वर येईल आणि हे सरकार कोणत्याही मुद्द्‌‍यावर चर्चा करणार नाही,” अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली.

आम्ही लोकशाहीत हुकुमशाही चालू देणार नाही : ”काल त्याबाबतीत प्रस्ताव मांडला होता. त्यात सुधारणा मागितल्या आहेत. या सुधारणा काय आहेत हे त्यांनी सांगितलं नाही. या विधेयकात आम्हाला सरकारच्या विरोधात बोलायचा, मोर्चा काढायचा अधिकार नाही. ते या बिलावर आम्हाला चर्चा करू देणार नाहीत. नेमकं बिल काय आहे हे आम्ही आता पाहू. आम्ही लोकशाहीत हुकूमशाही चालू देणार नाही. आमच्या विरोधात बोललात तर मुद्दाम तुम्हाला नक्षलवादी ठरवण्यात येईल असं सरकारचं धोरण आहे,” असं म्हणत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली.

जनसुरक्षा विधेयक आल्यावर बघू : ”जनसुरक्षा विधेयक आल्यावर त्यावर चर्चा करू” अशी एका वाक्यात प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी जनसुरक्षा विधेयकाबाबत दिली.