मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा (इयत्ता आठवी) अंतिम निकाल आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीचा एकूण निकाल 22.06 टक्के लागला आहे. इयत्ता पाचवीचा निकाल 23.09 टक्के, तर इयत्ता आठवीचा निकाल 19.30 टक्के लागला आहे.
एकूण निकालामधील 31 हजार 786 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, त्यात इयत्ता पाचवीमधील 16 हजार 693 विद्यार्थ्यांचा, तर आठवीतील 15 हजार 93 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी 9 फेब्रुवारी 2025 रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून 9 लाख 44 हजार 463 विद्यार्थांनी नोंदणी केली होती. शिष्यवृत्तीसाठी नोंदणी केलेल्यांमध्ये इयत्ता पाचवीतील 5 लाख 66 हजार 368, तर इयत्ता आठवीसाठी 3 लाख 78 हजार 95 विद्यार्थ्यांचा समावेश होता. यापैकी 9 लाख 13 हजार 258 विद्यार्थी उपस्थित होते.
उपस्थितांमध्ये इयत्ता पाचवीतील 5 लाख 47 हजार 504, तर इयत्ता आठवीतील 3 लाख 65 हजार 754 विद्यार्थ्यांचा समावेश होते. या दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतरिम निकाल 25 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला. गुणपडताळणीसाठी शाळांकडून 25 एप्रिल ते 4 मे या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. परिषदेने या कालावधीमध्ये आलेले अर्ज निकाली काढून अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर केली. परिषदेने जाहीर केलेल्या निकालानुसार इयत्ता पाचवीतील 1 लाख 30 हजार 846 आणि इयत्ता पाचवीतील 70 हजार 571 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
शिष्यवृत्तीचा एकूण निकाल 22.06 टक्के इतका लागला असून, यामध्ये इयत्ता पाचवीचा निकाल 23.09 टक्के, तर इयत्ता आठवीचा निकाल 19.30 टक्के इतका आहे. तर शासनमान्य मंजूर संचानुसार शिष्यवृत्तीसाठी पाचवीतील 16 हजार 693 विद्यार्थी, तर आठवीतील 15 हजार 93 विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
किती मिळते शिष्यवृत्ती
इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील तीन वर्षासाठी वार्षिक पाच हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते. तर इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्षासाठी वार्षिक साडेसात हजार रुपये इतकी मिळते.
शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थी
संच – इयत्ता पाचवी – इयत्ता आठवी
राष्ट्रीय ग्रामीण – 340 – 340
ग्रामीण सर्वसाधारण – 8124 – 6426
शहीर सर्वसाधारण – 7863 – 6430
सर्वसाधारण मुले/मुली – 243 – 141
सर्वसाधारण मुली – 19 – 21
मागासवर्गीय मुले/मुली – 93 – 16
मागासवर्गीय मुली – 11 – 13
तालुकास्तरीय शिष्यवृत्ती – इयत्ता आठवी
ग्रामीण सर्वसाधारण – 1123
ग्रामीण अनुसूचित जाती – 246
ग्रामीण भूमिहीन शेतमजूराचे पाल्य – 270 ग्रामीण आदिवासी – 67
