Spread the love

कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा

कसबा बावडा येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने युनायटेड किंगडममधील टिससाईड युनिव्हर्सिटी, मिडल्सबर्ग सोबत सामंजस्य करार केला आहे. या करारातर्गत अल्पकालीन विद्यार्थी व प्राध्यापक देवाणघेवाण, प्रकल्प सहयोग आणि इंटर्नशिप संधी उपलब्ध होणार असून युके आणि युरोपमध्ये उच्च शिक्षण, संशोधन व औद्योगिक अनुभवाचा नव्या वाटा खुल्या होणार आहेत.

पुणे येथे झालेल्या या करारासाठी टिससाईड युनिव्हर्सिटी कडून अधिष्ठाता डॉ.केविन व अधिष्ठाता डॉ.व्हिक्टोरिया रुशन यांनी परिश्रम घेतले. डी.वाय.पाटील महाविद्यालयाचे आंतरराष्ट्रीय संबंध प्रमुख डॉ.सनी मोहिते यांनी या कराराचे फायदे, शैक्षणिक व औद्योगिक दृष्टिकोनातून व्यवहार्यता याचे सादरीकरण केले. यावेळी  डॉ. कीर्ती महाजन आणि प्रा. गौरी मेहतर उपस्थित होते.

या सामंजस्य करारामुळे कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर शिक्षण व उद्योग क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध करण्याची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे.

 डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे,  कुलसचिव डॉ. एल. व्ही. मालदे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.