Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

काही दिवसांपूर्वी मीरा-भाईंदर येथे मराठी माणसाविरोधात काही स्थानिक परप्रांतीय व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. याला उत्तर म्हणून आज मीरा-भाईंदर येथे मराठी माणसांचा मोर्चा निघणार असून, मोर्चाआधीच पोलिसांनी मनसे आणि मराठी एकीकरण समितीच्या नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केल्याने हा मोर्चा आता वादात सापडलाय. अशातच मीरा-भाईंदर पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव यांना मध्यरात्री तीन वाजता ताब्यात घेतले असून, संदीप देशपांडे आणि माजी आमदार राजू पाटील आणि मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनादेखील पोलिसांनी नोटिसा पाठवल्या आहेत. इतकेच नाही तर मीरा-भाईंदर येथे जमावबंदीचे आदेश लागू केल्याने मनसे नेत्यांकडून संताप व्यक्त केला जातोय.

मराठी एकीकरण समितीकडून विशाल मोर्चाचे आयोजन : आज मीरा-भाईंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी एकीकरण समितीकडून विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या माध्यमातून मराठी भाषा आणि संस्कृतीची ओळख सर्वांना व्हावी हा प्रयत्न असल्याचे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी सांगितले. या आंदोलनात मीरा-भाईंदर येथील मराठी माणसाने मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन करणारे बॅनर आणि पोस्टर परिसरात सर्वत्र लावण्यात आले आहेत. या आंदोलनात मनसे मराठी एकीकरण समिती आणि अन्य मराठी संघटना सहभागी होणार आहेत.

आम्ही मराठी असणे आमचा गुन्हा आहे का? : यासंदर्भात बोलताना मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी सांगितले की, ही दडपशाही योग्य नाही. आम्ही मराठी असणे आमचा गुन्हा आहे का? मीरा-भाईंदर शहरातील मोर्चाचे सर्व फलक उतरवले. इंग्रजही इतके अत्याचार करत नसतील, असे वाटतंय. माझ्यासह मीरा-भाईंदर शहरातील सर्व मराठी सामाजिक, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा पाठवल्या आहेत. पोलीस अटक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. रात्रभर पोलीस घरोघरी जात आहेत. काहींना घरून उचलून घेऊन गेले. माझ्या घरी रात्री 1 वाजेपर्यंत पोलीस होते. घरच्यांना घाबरवून काय सिद्ध करताय?” असा सवाल गोवर्धन देशमुख यांनी विचारलाय.

शिंदे आम्ही नक्की मराठी राज्यात आहोत ना? : ”देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आम्ही नक्की मराठी राज्यात आहोत ना? स्वातंत्र्य मिळाले आहे ना देशाला? मराठी माणसे एकत्र का येऊ द्यायची नाहीत? मराठी एकजूट का नकोय तुम्हाला? कोणासाठी आमच्यावर दादागिरी आणि दडपशाही? मराठी माणूस काहीही करायचं म्हणाला तर इतकी दडपशाही कशासाठी? परप्रांतीयांना रान मोकळे. याच मीरा भाईंदरात अनेक मोर्चे आणि आंदोलनं होतात. हजारोंच्या संख्येने परप्रांतीय रस्त्यावर उतरतात. तेव्हा का नाही इतकी तत्परता दाखवत? तेव्हा त्यांच्या घरी पोलीस का नाही जात? त्यांना का नोटीस नाहीत? त्यांना का नाही नजर कैदेत ठेवत?” असा सवाल गोवर्धन देशमुख यांनी सरकारला विचारलाय.

मराठी अस्मितेची ही चळवळ तुम्हाला का नकोय? : पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, ”दरवेळी मराठीसाठी आवाज उठविणे, आंदोलन करायचे म्हणाले तर पोलीस घरी येतात. असे पारतंत्र्यात राहिल्यासारखे का भासवता आम्हाला? बरं आपण कोणाला त्रास देतोय हे पोलिसांनासुद्धा समजू नये? हे काय आमचे खासगी काम करतोय का आम्ही? मराठी अस्मितेची ही चळवळ तुम्हाला का नकोय? विरोधी पक्ष विधानसभेत काही बोलणार आहे का? आज मराठी माणसे एकवटणार हे कोणाच्या डोळ्यात सलतेय? आम्ही सामान्य माणसं आमची कोणाला भीती आहे? आम्ही एकत्र का नाही यायचं?” असा सवाल मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केलाय.

मराठी माणूस या मोर्चाचे नेतृत्व करेल : या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनीदेखील पक्षाची भूमिका स्पष्ट केली असून, ”मीरा-भाईंदर पोलिसांनी आमच्या पक्षाच्या नेत्यांना काल रात्री अटक केली असली तरी मराठी माणूस या मोर्चाचे नेतृत्व करेल. मोर्चा हा निघणारच. पोलिसांनी व्यापाऱ्यांच्या मोर्चांना परवानगी दिली. मग आमच्या मोर्चाला परवानगी का नाही? आता बिहार निवडणुका आहेत. त्यासाठीच महाराष्ट्र अशांत करण्याचे यांचे प्रयत्न आहेत. इथे नेमकं महाराष्ट्राचं सरकार आहे की गुजरातचे? परेस, सुदेस, नरेस यांना मोर्चाची परवानगी मिळते आम्हाला का नाही?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.