अमरावती / महान कार्य वृत्तसेवा
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील राजकारणात मोठ्या राजकीय हालचाली होत आहेत. भाजपाचे माजी नेते जगदीश गुप्ता यांनी भाजपा सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे.
माजी महापौरांसह दहा माजी नगरसेवक गुप्तांसोबत- सोमवारी रात्री जगदीश गुप्ता यांच्यासह अमरावतीचे माजी महापौर नितीन वानखेडे, अमरावती महापालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती नितीन चांडक, राजू राठी, विलास रोढे आणि महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेता सुरेंद्र पोपली शिवसेनेत सामील झालेत. यासोबतच अमरावती महापालिकेचे मनीष जोशी, सुभाष रत्नपारखी, प्रशांत महाजन, अनिल कडू, भास्कर मानमोडे, वासुदेव देऊळकर आणि चिखलदरा नगरपरिषदेचे डॉ. राजेश जयपूरकर हे भाजपाचे माजी नगरसेवकदेखील शिवसेनेत दाखल झाले.
जगदीश गुप्तांचा असा आहे राजकीय पट- अमरावती शहर आणि जिल्ह्यात भाजपाचे संघटन आणि राजकीय ताकद बळकट करण्यात जगदीश गुप्ता यांचा मोठा वाटा आहे. 1990 आणि 1995 अशा सलग दोन विधानसभा निवडणुकीत भाजपाचे जगदीश गुप्ता विजयी झाले. विशेष म्हणजे याच काळात अमरावती पालिकेवर पहिल्यांदा भाजपाचा झेंडा फडकला. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. सुनील देशमुख यांनी गुप्ता यांचा पराभव केला. त्यानंतर 2016 पर्यंत जगदीश गुप्ता यांनी विधान परिषदेत नेतृत्व केलं.
2024 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार- 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जगदीश गुप्ता यांनी भाजपाशी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभा खोडके या 60 हजार 87 मतं घेऊन निवडून आल्यात तर जगदीश गुप्ता हे चौथ्या स्थानावर होते. गुप्ता यांना 34 हजार 67 मतदारांनी पसंती दर्शविली होती.
महापालिका निवडणुकीत वाढेल चुरस – गेल्या तीन महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेची परिस्थिती अतिशय नाजूक राहिली. शिवसेनेत जगदीश गुप्ता यांच्या प्रवेशामुळं महापालिका निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विधानसभा निवडणुकीत बडनेरा मतदारसंघात शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे अपक्ष निवडणूक लढणाऱ्या प्रीती बंड यांच्यासह शिवसेनेतील (यूबीटी) शेकडो शिवसैनिकांनी यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे.
संघटन बळकट करणार- ”हिंदुत्वाचा विचार घेऊन विधानसभा निवडणूक लढवली. आता हाच विचार समोर नेत अमरावती शहरात शिवसेनेचं संघटन बळकट करणार आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आमचं वर्चस्व सिद्ध करण्याचं आम्ही सर्व शिवसैनिक प्रयत्न करणार आहोत,” असं जगदीश गुप्ता यांनी म्हटलंय.
