Spread the love

छत्रपती संभाजीनगर / महान कार्य वृत्तसेवा

अत्यंत अवघड परीक्षा म्हणून ओळख असलेल्या सनदी लेखापाल म्हणजेच ‘सीए’च्या मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परिक्षेत छत्रपती संभाजीनगर शहरातील राजन काबरा यानं देशात प्रथम क्रमांक पटकावला. मे 2025 मध्ये झालेल्या परिक्षेत राजन काबरा याला 600 पैकी 516 गुण मिळालेत. त्याच्या कामगिरीमुळं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

वडिलांकडून मिळाली प्रेरणा : अभ्यासात सातत्य राखल्यानं यश मिळाल्याचं सीए परीक्षेत देशात प्रथम आलेल्या राजन काबरा यानं व्यक्त केली. देशातील 9,9,466 परीक्षार्थींनी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स परीक्षा दिली होती. त्यात राजन काबरा यानं देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. ”निकाल लागल्यानंतर आयसीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणजोत सिंग नंदा यांनी फोन करून माहिती दिली. ते प्रथम पहिलं स्वप्न वाटलं. पण नंतर हे खरं असल्यानं आनंद झाला. वडील देखील सीए असल्यानं त्यांच्याकडं पाहून प्रेरणा मिळाली,” असं त्यानं सांगितलं.

सीए परिक्षेत देशात अव्वल : राजन काबरा वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात देशात पहिला येत सीए परीक्षा उत्तीर्ण झाला. राजननं टेंडर केअर शाळेतून शिक्षण घेतलं. यानंतर त्यांनं देवगिरी महाविद्यालयातून शिक्षण घेतलं. पुणे विद्यापीठातून कॉमर्स शाखेतून राजननं पदवी मिळवली आहे. कॉमर्स शाखेतून पदवी मिळवल्यानंतर मुंबईमध्ये आर्टिकलशिप करायला त्यानं सुरुवात केली.2021 मध्ये झालेल्या सीपीटी परिक्षेत राजननं देशात प्रथम क्रमांक पटकावला होता. मे 2022 मध्ये झालेल्या सीए इंटरमिजीएट परिक्षेत राजन काबरा पहिला आला होता. सीएच्या अंतिम परिक्षेत देखील त्यानं पहिला क्रमांक मिळवत वेगळा विक्रम केलाय.

अभ्यासाचं योग्य नियोजन : ”नियमित अभ्यासाचं योग्य नियोजन केलं. काम करत असताना किमान दोन ते अडीच तास सराव करण्याचं ध्येय ठेवलं होतं. परिक्षेच्या आधी चार महिने रिव्हिजन करून यश मिळवलं. अभ्यास करताना बारा तासांहून अधिक अभ्यास केला नाही. मात्र, नियोजन व्यवस्थित केलं होतं. विरंगुळा हवा असल्यास विनोदी मालिका पाहणं, आई – वडिलांशी किंवा बहिणीशी संवाद करायला आवडायचं. सोशल मीडियापासून दूर असलो तरी युट्यूबवर असलेले अभ्यासक्रमाचे व्हिडिओ आवर्जून पहायचो. तसे व्हिडिओ सतत पहायला मिळतील अशी सेटिंग केल्यानं अभ्यासासंदर्भात व्हिडिओ पाहायला मिळायचे. त्याचा फायदा झाला,” असं राजन काबरा यानं सांगितलं.

वडील देखील आहेत सीए : राजन काबरा याचे वडील मनोज काबरा हे देखील सीए आहेत. ”लहानपणापासून त्यांचं काम पाहून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आहे. त्यातूनच वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. आता पुढं काय करायचं हे लवकरच ठरवेन,” अशी भावना राजन यानं व्यक्त केली.