मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मिरा-भाईंदरमध्ये आज (मंगळवारी, ता-8) महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आज सकाळी दहा वाजता बालाजी हॉटेलपासून या मोर्चाला सुरुवात होणार होती. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. अनेक कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आम्ही मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचे म्हटले होते. या ठिकाणी ठाकरे गट आणि मनसे यांच्या आंदोलनासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांना आणि मराठी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान या प्रकरणी मिरा-भाईंदर भाजप आमदार नरेंद्र मेहता याबाबत बोलताना म्हणाले, मोर्चा काढणं चुकीचं नाही. पोलिसांकडे गोपनीय विभाग देखील असतो. पडद्यामागे काय वेगळं सुरु असेल त्यामुळे पोलिसांनी परवानगी दिली नसेल असं वाटतं, असंही पुढे नरेंद्र मेहता यांनी म्हटलं आहे.
पुढे नरेंद्र मेहता म्हणाले, परप्रांतीय मोर्चाला परवानगी दिली नव्हती. अशात ते एका सभागृहात होते, काही लोकं त्या दुकानात गेलेत. मात्र कोणी कोणाला शिवीगाळ केल्या नाहीत. मोर्चे आम्ही पण काढत असतो मात्र हेतू चुकीचा असेल कायदा आणि सुव्यवस्थासाठी राखण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली नसेल. मराठी एकीकरण समितीनं एका मुस्लीम व्यक्तीला पाठिंबा दिला होता. मराठी माणूस उभा होता, मात्र काँग्रेसचा मुस्लिम उमेदवार होता त्यांना पाठिंबा दिला. हे सगळं पाठीमागून चालवणारे काँग्रेस आहे. मनसे असेल किंवा इतर पक्ष असेल याआधी मोर्चे निघाले आहेत.यातच काही उलटंसुलटं उघडलं तर तुम्हीच पोलिसांना जबाबदार धराल. भाजपचे लोकं देखील काही जण मोर्चात सहभागी होते. मात्र, जेव्हा लक्षात आलं याला काँग्रेस आणि मनसे फूस लावते आहे त्यानंतर आमचे लोकं नाही थांबले. चांगल्या गोष्टींसाठी आमचा पाठिंबा असणारच आहे. आम्ही अनेकदा मराठी माणसाच्या पाठीमागे उभे राहिलो आहोत, असंही नरेंद्र मेहता यांनी म्हटलं आहे.
कायदा सुव्यवस्था बिघडेल हा रूट नसू नये
भाजप कार्यालयाचे येथून हा मोर्चा जाणार होता आणि त्यामुळे हा रूट बदलावा असं पोलिसांनी सांगितलं होतं. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार होता आणि त्यामुळेच तिथे परवानगी पोलिसांनी दिली नाही. पोलिसांची माझ्या काल रात्री या सगळ्या संदर्भात बोलणं झालं होतं. मराठी माणसांनी मोर्चा काढावा व्यापाऱ्यांनी मोर्चा काढावा त्यासाठी नोटीस दिल्या जातात अगदी आम्ही मोर्चा काढतो तेव्हा सुद्धा नोटीस दिल्या जातात. मात्र अशाप्रकारे कायदा सुव्यवस्था बिघडेल हा रूट नसू नये. मी सगळ्यांना शांततेचा आवाहन करतो, असंही नरेंद्र मेहता यांनी म्हटलं आहे.
मोर्चाला परवानगी का नाही? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
मीरा भाईंदरमध्ये काही दिवसांपूर्वी काढलेल्या अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी कशी दिली, असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. मी पोलिसांना विचारलं त्याच्यावर सीपींनी मला सांगितलं की, जो रूट दिला त्या रूटवर जुना मोर्चा निघाला त्यांनी कुठल्याही रुटचा आग्रह केला नव्हता. मनसेने स्पेसिफिक अशा रुटचा आग्रह केला. जिथे मोर्चा काढणं कठीण आहे, असा रुट मागण्यात आला. काल रात्री मग त्यांनी अशी मागणी केली की आम्हाला सभा घ्यायची आहे, त्याची परवानगी त्यांना दिली होती, असे फडणवीसांनी सांगितले. तुम्ही सभा घ्या पण त्यांना स्पेसिफिक अशा ठिकाणीच तो मोर्चा न्यायचा होता की ज्यातनं काही अडचणी निर्माण झाल्या असत्या आणि कायदा सुव्यवस्थेचा विषय निर्माण झाला असता. आता इतके वर्षे आपण सगळेच मोर्चे काढतोय. मोर्चे काढत असताना आपण पोलिसांची चर्चा करून रूट ठरवत असतो. आता ज्यावेळेस 5 तारखेचा मोर्चा या दोन संघटनांनी काढायचा ठरवला होता तर मुंबईत त्यांच्याशी चर्चा होऊन रुट ठरला होता. मोर्चा काढायला कोणालाही ना नाहीये, पण एखाद्या मोर्चाने जर कायदा सुव्यवस्थेत काही गडबड होणार असेल किंवा अशा मार्गाने तो जाणार असेल की ज्याच्यावर कठीण आहे, पोलिसांना कायदा सुव्यवस्था ठेवणे कठीण आहे किंवा ट्रॅफिक कंट्रोल करणं कठीण आहे. आता तो रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर रेल्वे स्टेशनवर आपल्याला माहिती मीरा-भाईंदरचा रेल्वे स्टेशनची काय परिस्थिती असते. त्यामुळे पोलिसांनी सातत्याने त्यांना विनंती केली की तुम्ही हा रोड बदला. पण ते मोर्चाचा रोड बदलायला तयार नव्हते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
