छत्रपती संभाजीनगर / महान कार्य वृत्तसेवा
खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकाला भेट म्हणून दिलेली जमीन बेकायदा असल्याचा दावा सालारजंग यांची कन्या सय्यदा तय्यबा फातेमा यांचे मुख्तियार धारक शिवकुमार चव्हाण यांनी केलाय. शहरात सालारजंग या शाही कुटुंबीयांतील अधिकार नसलेल्या लोकांनी जमिनी भेट म्हणून कशा दिल्या असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. असे अनेक प्रकरणं आधीदेखील न्यायालयात गेलेली आहेत. असे असताना काही लोक वारस किंवा नवाब म्हणून घोळ घालत आहेत. सध्याचा झालेला घोटाळा हा दीडशे कोटींचा नव्हे तर पाचशे कोटींचा आहे. मागील वर्षी असाच एक व्यवहार झाला, ज्यामध्ये धनादेशाद्वारे व्यवहार झाला. प्रशासकीय अधिकारी आणि भूमाफिया यांच्या माध्यमातून फसवणूक सुरू आहे. या प्रकरणी अनेक वेळा तक्रार देऊनही न्याय मिळत नसल्याची खंत शिवकुमार चव्हाण यांनी व्यक्त केली.
असे आहे प्रकरण?- छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोडवरील दाऊदपुरा येथील ही जमीन वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार संदिपान भुमरे यांचा चालक जावेद रसूल शेख याच्या नावावर सालारजंगने जमीन भेट केली आहे. छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या चालकाला चौकशीसाठी बोलावलं होते. त्याच्या आयकर रिटर्नच्या प्रती, उत्पन्नाचे स्थापित स्रोत आणि त्याच्या नावावर दिलेली भेट कोणत्या आधारावर केली आहे, याची चौकशी सुरू करण्यात आलीय. सालारजंग वंशज मीर मजहर अली खान आणि त्यांच्या सहा नातेवाईकांनी स्वाक्षरी केलेल्या हिबानामाची चौकशी केली जात आहे. याप्रकरणी परभणी येथील ॲड. मुजाहिद खान यांनी सदरील जमीन विकत घेतल्याचा दावा करीत तक्रार दिली. या प्रकरणी माझ्या वडिलांचे आणि हैदराबाद सालारजंग यांचे जुने कौटुंबिक संबंध आहेत, त्यामुळे मलाही जमीन गिफ्ट दिलेली आहे, असं स्पष्टीकरण भुमरे यांचे चालक जावेद शेख यांनी दिले होते.
हा घोटाळा पाचशे कोटींचा – सालारजंग यांची कन्या सय्यदा तय्यबा फातेमा यांचे मुख्तियार धारक शिवकुमार चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण प्रसिद्ध केले. त्यानुसार खासदार भुमरे यांच्याशी निगडीत असलेली जमीन ही तीन एकर नसून नऊ एकर आहे, ज्याचे बाजारमूल्य दीडशे कोटी नव्हे पाचशे कोटी असल्याचा दावा त्यांनी केलाय. सदरील जमीन भूमापन क्रमांक 14844 अ आणि ब असा आहे. याचा हैदराबाद येथे राहणाऱ्या मेहमूद अली याने अधिकृत वारस नसताना चालक जावेद रसूल याच्या नावाने दोन अनधिकृत हिबानामा करून दिलाय. मेहमूद अली यांनी अनेकांना करार पद्धतीने किंवा हिबानामा करून दिलाय. अनेकांकडून त्यासाठी पैसेदेखील घेतल्याची माहिती आहे, त्या संबंधी आम्ही पोलीस आयुक्तांना तक्रार दिल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.
भूमाफिया यांच्याशी संगनमत करून व्यवहार- सय्यदा तय्यबा फातेमा या सालारजंग मिळकतीच्या कायदेशीर वारस आहेत. त्यांनी हैदराबाद न्यायालयामधून कायदेशीर वारसा प्रमाणपत्र मिळवलंय, ज्याचा संदर्भ क्रमांक (ध्ए 68/65, 1970 आणि ध्ए 2378/2005) असा आहे. सदरील कागदपत्र गुन्हे शाखेला दिली आहेत, त्याची पडताळणी सुरू आहे. शहरात सालारजंग यांच्या मिळकतीचे वारस किंवा नवाब म्हणून व्यवहार करीत आहेत. ते कायदेशीर वारसदार म्हणून निश्चित नाहीत. काही लोक ण्ए 13/1958 याचा आधार घेऊन शासकीय भूमापन अधिकारी यांच्याशी संगनमत करून सर्व व्यवहार केले जात आहेत. ही फसवणूक असून, या विरोधात दाद मागत आहोत, तरी कोणीही न्याय द्यायला तयार नसल्याने पत्रकार परिषदेत भूमिका मांडल्याचं सालारजंग यांची कन्या सय्यदा तय्यबा फातेमा यांचे मुख्तियार धारक शिवकुमार चव्हाण यांनी सांगितलंय.
