Spread the love

सिंधुदुर्ग / महान कार्य वृत्तसेवा

सावंतवाडी शहरातील प्रिया चव्हाण या विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी आता पोलीस चौकशीला वेग आला आहे. या प्रकरणी मृत प्रिया चव्हाण यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली मिलिद मानेसह (42) तिच्या मुलावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत प्रिया यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आला आहे. माने ही मृत प्रिया चव्हाण यांची नंणद असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील विवाहिता प्रिया चव्हाण यांनी शुक्रवारी सकाळी राहत्या घरी आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर प्रिया यांनी आपल्या चार वर्षांच्या मुलीला मागे ठेवत आत्महत्येचे पाऊल का उचलले असावे? याचीच सर्वत्र चर्चा होती. मात्र, यावर उघडपणे कोणीही बोलण्यास तयार नव्हते. या प्रकरणी आता प्रिया यांच्या माहेरच्या नातेवाईकांकडून या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती.

आणखी जणांचे पोलीस नोंदविणार जबाब- आमची मुलगी एवढे टोकाचे पाऊल उचलूच शकत नाही. तिला आत्महत्या करण्यास कोणीतरी प्रवृत्त केल्याची तक्रार प्रिया चव्हाण यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी पोलिसात केली. तसेच मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशीची त्यांनी मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी रविवारी प्रिया चव्हाण यांच्या सासरच्या मंडळीचे जबाब नोंदविले आहेत. आणखी काहींचे जबाब नोंदविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी दिली आहे.

आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप- विवाहितेच्या आत्महत्ये मागचे कारण पुढे आले नव्हते. मात्र आत्महत्येच्या घटनेनंतर पोलिसांकडून प्रिया यांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला होता. पुढे काही तपास झाला नसल्यानं प्रिया यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी सखोल तपास व्हावा, अशी मागणी लावून धरली होती. त्यानंतर प्रिया यांचे वडील विलास तावडे यांनी रविवारी सावंतवाडी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीत मुलीच्या आत्महत्येला सासरच्या मंडळीचे नातेवाईक जबाबदार असल्याचं म्हटलं. त्यांनी थेट प्रणाली माने आणि अन्य एकाने आपल्या मुलीला आत्महत्येपूर्वी सतत त्रास दिल्याचं तक्रारीत नमूद केलं. अपमानित करणं आणि जीवाला लागेल असे बोलल्यानं तिनं हे पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे. वडिलांच्या या तक्रारीवरून रात्री उशिरा पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने आणि त्यांच्या मुलाचा समावेश आहे. या घटनेचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.

हुंडा पद्धतीमुळे विवाहित महिलांच्या आत्महत्या घडल्याचे अनेक प्रकार- यापूर्वीदेखील सासरच्या लोकांनी त्रास दिल्यानं विवाहित महिलांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेषत: अलीकडच्या काळात पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या आत्महत्येनंतर हुंडाबळीची समस्या चव्हाट्यावर आली होती. या प्रकरणात मृत वैष्णवी यांचे सासू, सासरे, नणंद, आणि दीर यांनी हुंडा मागणी आणि छळ केल्याचा आरोप आहे. ‘हुंडा प्रतिबंधक कायदा’ नुसार हुंडा देण्या आणि घेण्याबद्दल कमीत कमी 5 वर्षे इतक्या कारावासाची आणि कमीत कमी 15 हजार रुपये दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे.