बर्मिंगहॅम / महान कार्य वृत्तसेवा
भारतीय संघाचा नवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन कसोटी सामना 336 धावांनी जिंकला. या विजयासह भारतीय संघानं पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. लीड्समधील पहिल्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर, भारतीय संघानं केलेल्या जबरदस्त पुनरागमनाचा खरा नायक कर्णधार शुभमन गिल होता.
एका कसोटीत सर्वाधिक धावा : एजबॅस्टन कसोटी सामन्यात भारताच्या दोन्ही डावात शतकं झळकावून शुभमन गिलनं विक्रमी कामगिरी केली. पहिल्या डावात शुभमन गिलनं 30 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीनं 269 धावा केल्या, जी त्याची सर्वोत्तम कसोटी धावसंख्या ठरली. दुसऱ्या डावात त्याच्या बॅटनं 161 धावा काढल्या. म्हणजेच या सामन्यात शुभमनचा एकूण धावसंख्या 430 होती, जी कसोटीतील कोणत्याही भारतीय फलंदाजासाठी सर्वाधिक आहे.
शुभमन गिल वादात : शुभमन गिलची मैदानावरील कामगिरी उत्कृष्ट होती, पण दरम्यान तो वादात अडकलेला दिसतो. कारण जेव्हा शुभमन गिल भारतीय संघाचा दुसरा डाव घोषित करण्यासाठी ड्रेसिंग रुममधून बाहेर आला तेव्हा त्यानं काळ्या रंगाचा नाईक टी-शर्ट घातला होता. हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नियमांचं उल्लंघन मानलं जात आहे.
नियमाच्या उल्लंघनाचं कारण काय : भारतीय क्रिकेट संघाचा अधिकृत किट प्रायोजक ॲडिडास आहे आणि बीसीसीआयसोबतचा त्यांचा करार मार्च 2028 पर्यंत आहे. या करारानुसार भारताचा पुरुष संघ, महिला संघ आणि सर्व वयोगटातील क्रिकेट किट ॲडिडास प्रायोजित करेल. अशा परिस्थितीत, शुभमन गिलनं दुसऱ्या कंपनीचा लोगो असलेला किट परिधान करणं या कराराचं उल्लंघन ठरु शकतं.
गांगुलीनंही केलं होतं नियमांचे उल्लंघन : शुभमन गिलचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी त्यावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. काही लोकांनी विनोदी पद्धतीनं प्रतिक्रिया दिली, तर काहींनी ते बीसीसीआयच्या व्यवसाय नियमांचं उल्लंघन मानलं. मात्र बीसीसीआय गिलवर काही कारवाई करणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 2006-07 मध्ये सौरव गांगुलीला प्यूमा हेडबँड घातल्याबद्दल शिक्षा झाली कारण त्यावेळी नाईक किट प्रायोजक होता. त्या घटनेनंतर, बीसीसीआयनं खेळाडूंना अशा पोशाखांपासून दूर राहण्याचे निर्देश दिले होते, जे नियमांचं उल्लंघन करण्याच्या कक्षेत येतं.
