फार्मर आयडी, ई-पीक पाहणी यावर्षीपासून अनिवार्य
कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा
मागील 2 वर्षापासून एक रुपयात सुरु असणारी पिकविमा योजना बंद करुन सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना यावर्षीच्या खरीप हंगामापासून लागू करण्यात आलेली आहे. सुधारित पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासनाने जारी केल्या आहेत. या योजनेत फार्मर आयडी व ई पीक पाहणी अनिवार्य असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत 31 जुलै 2025 अखेर सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी आपल्या नजिकच्या कृषी कार्यालयास संपर्क करावा, असे आवाहन कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पीक पाहणी व फार्मर आयडी शेतकऱ्यांसाठी अनिवार्य राहणार आहे. ही योजना अधिसूचित मंडळात अधिसूचित पिकांसाठी लागू आहे. शिवाय कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी, कुळाने अथवा भाडेपट्ट्याने जमिनी घेणारे शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र आहेत. यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी नोंदणीकृत भाडेकरार संकेततस्थळावर अपलोड करावा लागणार आहे. ही योजना सर्व खातेदारांना ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांना 2 टक्के खरीप हंगामासाठी, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के तर दोन्ही हंगामातील नगदी पिकासाठी 5 टक्के भरावा लागेल. 70 टक्क्यापर्यंत पिकांचा जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे. यावर्षी सातारा, सांगली व कोल्हापूर या 3 जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनीची निवड शासनाने केली आहे. शिवाय सन 2025-26 या वर्षाकरीता 80:110 कप ऍ़ण्ड कॅप मॉडेल नुसार राबवण्यात येईल.
या पिकांचा काढता येईल पिक विमा
या योजनेमध्ये खरीप हंगामात तृणधान्य व कडधान्यात भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मुग, उडिद, तूर व मका तर गळीत धान्यात भुईमुग, तीळ व सोयाबीन तसेच नगदी पिकांमध्ये कापूस व कांदा, रब्बी हंगामात गहू (बागायत) रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) हरभरा व उन्हाळी भात, गळीत धान्यामध्ये उन्हाळी भुईमुग व नगदी पिकांमध्ये रब्बी कांदा या पिकांसाठी योजनेत सहभाग घेता येणार आहे.
खरीप हंगाम 2025-26 कोल्हापूर जिल्ह्याकरिता पिकनिहाय संरक्षित शेतकरी पिक विमा हप्ता रक्कम (हे./रुपये) पुढीलप्रमाणे-
विमा संरक्षित रक्कम- भात- 61 हजार, ज्वारी 33 हजार, नाचणी- 39 हजार, भुईमूग- 45 हजार व सोयाबीन- 58 हजार
शेतकरी विमा हप्ता रक्कम- भात- 457.50, ज्वारी- 82.50, नाचणी- 97.50, भुईमूग- 225 व सोयाबीन – 290 असून अंतिम मुदत 31 जुलै 2025 आहे.
ज्या सर्व्हे नंबरसाठी पीक विमा काढण्यात आला आहे त्या 7/12 उताऱ्यावर शेतकऱ्यांचे नाव नमुद नसणे, बोगस सात-बारा व पिक पेऱ्याच्या आधारे पिक विम्यात बोगस सहभाग घेणे, दुसऱ्या शेतकऱ्याच्या क्षेत्रात बोगस भाडेकराराद्वारे योजनेत सहभाग घेणे, विहित भाडेकरार न करता परस्पर विमा काढणे आदी प्रकरणे उघडकीस आल्यास संबंधित खातेदाराचा आधार क्रमांक 5 वर्षाकरीता काळ्या यादीत टाकून त्यास पुढील किमान 5 वर्षाकरिता कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तसेच तहसीलदार एफआयआर करणार असल्याची माहिती श्री. मास्तोळी यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
