मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
राज्यातील काही भागांत पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने पुणे घाटमाथा परिसरात अतिवृष्टीसदृश्य पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर ठाणे, नाशिक, पालघर, कोल्हापूर, सातारा आणि कोकणातील जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टी आणि घाट परिसरात पावसाचा जोर वाढणार आहे. पुणे घाटमाथालगत भागात काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातील इतर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ठाणे, नाशिक, कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा
नाशिक घाटमाथा भाग, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांत अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. या काळात कोकणात 45-55 किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील.
