मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
त्रिभाषा सूत्राच्या मुद्द्यावरून तब्बल 20 वर्षांनी एकत्र आलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर, आता त्यांच्या युतीबद्दलचा संभ्रम वाढला आहे. 5 जुलै रोजी वरळीतील ऱ्एण्घब डोममध्ये ‘संयुक्त मराठी जल्लोष मेळावा’ मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी ‘एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत,’ अशी भूमिका मांडली. मात्र, राज ठाकरे यांनी युतीबाबत कोणतीही थेट घोषणा केली नाही. त्यातच, आता राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना युतीसंदर्भात मला विचारल्याशिवाय कोणीही बोलू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उबाठा शिवसेना (ठाकरे गट) सोबतच्या युतीसंदर्भात माध्यमांसमोर किंवा सार्वजनिक ठिकाणी बोलू नये, असे निर्देश दिले आहेत. ”कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी युती संदर्भात बोलताना आधी मला विचारायचे,” असे राज ठाकरे यांनी सांगितल्याने दोन्ही पक्षांच्या युतीबद्दल नवा संभ्रम निर्माण झाला आहे.
उद्धव ठाकरे उत्सुक, पण राज ठाकरे सावध?
वरळीतील व्यासपीठावर ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दोन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चांना जोर पकडला होता. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अनेकदा राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी तीव्र इच्छा व्यक्त केल्याचे संकेत दिले. मात्र, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भात अतिशय सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्यांनी यावर फारसे भाष्य करणे टाळले.
राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार!
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात, मराठी माणसांची एकजूट व्हावी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण व्हावे, असे भावनिक आवाहन केले. मात्र, भविष्यात युती कायम राहील, याबाबत कोणताही स्पष्ट संकेत त्यांनी दिला नाही. त्यामुळे युतीसाठी उद्धव ठाकरे यांनी हात पुढे केले असले तरी, राज ठाकरे यांची भूमिकाच निर्णायक ठरणार आहे.
मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वीस वर्षांनी एकत्र आले असले तरी, मनसे आणि ठाकरे गटाची खरोखरच युती होणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. राज ठाकरेंच्या या आदेशामुळे आता या चर्चांना तात्पुरता ‘ब्रेक’ लागला आहे, असे म्हटले जात आहे.
