ब्राझीलिया / महान कार्य वृत्तसेवा
‘ब्रिक्स’च्या अमेरिकाविरोधी धोरणांशी जुळणाऱ्या कोणत्याही देशावर अतिरिक्त 10ज्ञब कर आकारला जाईल, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे तसेच या नियमाला जगातील कोणताही देश अपवाद राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, ”जो कोणताही देश ब्रिक्सच्या अमेरिकाविरोधी धोरणांसोबत जाईल, त्याच्यावर 10ज्ञब अतिरिक्त जकात आकारली जाईल. या धोरणाला कोणताही अपवाद असणार नाही. या प्रकरणी लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!” असे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले. ट्रम्प यांनी अतिरिक्त कराची धमकी दिली असली तरी अमेरिकाविरोधी धोरण कोणती याबाबत स्पष्ट केलेले नाही.
ब्रिक्स नेत्यांनी ”रिओ डी जानेरो घोषणापत्र” प्रसिद्ध केले. यानंतर काही तासांतच ट्रम्प यांनी अतिरिक्त कर लावण्याची धमकी दिली आहे. कारण ब्रिक्स नेत्यांनी प्रसिद्ध केलेल्या घोषणापत्रात अमेरिकेतील वाढत्या करावर टीका करण्यात आली आहे. तसेच अमेरिकेच्या या धोरणांमुळे जागतिक व्यापाराला धोका निर्माण होवू शकतो, असा इशाराही दिला आहे. मात्र ब्रिक्स नेत्यांनी जाहीर केलेल्या घोषणापत्रात डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिकेचे नाव घेतलेले नाही.
ब्रिक्स नेत्यांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ”व्यापार-प्रतिबंधक कृतींचा प्रसार, मग तो जकातींमधील अविवेकी वाढ असो किंवा इतर गैर-जकात उपाययोजना, यामुळे जागतिक व्यापारात आणखी घट होण्याचा, जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक व व्यापारी घडामोडींमध्ये अनिश्चितता निर्माण होण्याचा धोका आहे.” गटाने नियमांवर आधारित, खुली, पारदर्शक, न्याय्य, सर्वसमावेशक आणि न्यायसंगत बहुपक्षीय व्यापार प्रणालीला आपला पाठिंबा पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. विकसनशील सदस्यांना विशेष आणि वेगळी वागणूक देण्याच्या तत्त्वालाही आमचा पाठिंबा आहे,” असे या घोषणापत्रात म्हटले आहे.
भारत आणि युरोपीय संघ (ईयू) यांच्याशी अमेरिकेच्या वाटाघाटी सुरू आहेत; परंतु त्यात कोणताही तोडगा निघालेला नाही. चर्चा रखडली आहे. भारताने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. वाटाघाटींना वाव नसलेला एकतर्फी करार स्वीकारण्यास सरकार तयार नाही.लवकरच करार न झाल्यास, अमेरिकेच्या वेळापत्रकानुसार भारत आणि युरोपीय संघ या दोघांनाही 1 ऑगस्टपासून वाढीव कराचा सामना करावा लागू शकतो.
