इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
शहापूर पोलिस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाने दोन सराईत मोबाईल चोरट्यांना गजाआड केले आहे. हर्षवर्धन शिवकांत काटे (वय 19 रा. गणेशनगर) व बबलु उमाजी जुवे (वय 22 रा. लोकमान्यनगर कोरोची) अशी त्यांची नांवे असून त्यांच्याकडून 5 मोबाईल, 3 मोटरसायकली असा 1 लाख 26 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गणेशनगर गल्ली नं. 9 मध्ये शुभम पाटील यांचा यंत्रमाग कारखाना आहे. या कारखान्याच्या वरील बाजूस असलेल्या खोलीच्या दरवाज्याची कडी खिडकीतून हात घालत चोरट्यांनी दरवाजा उघडला आणि खोलीत असलेला मोबाईल चोरुन नेला होता. या प्रकरणी शहापूर पोलिसात तक्रार नोंद करण्यात आली होती. त्या अनुषंगाने तपास सुरु असताना गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना बातमीदारामार्फत प्राप्त माहितीवरुन हर्षवर्धन काटे व बबलु जुवे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पण पोलिसी खाक्या दाखवताच गणेशनगर येथील कारखान्यासह अन्य दोन ठिकाणी केलेल्या चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन गुन्ह्यातील 5 मोबाईल व चोरलेल्या दोन व गुन्ह्यासाठी वापरलेली एक अशा तीन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई पोलिस निरिक्षक सचिन सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलिस अंमलदार अविनाश मुंगसे, आयुब गडकरी, रोहित डावाळे, अर्जुन फातले, शशिकांत ढोणे, येवाजी चळचुक यांच्या पथकाने केली.
