Spread the love

पुलाची शिरोली / महान कार्य वृत्तसेवा

हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथे  डोंगर परिसरात बिबट्याच्या सतत वावर आहे. येथील वाघजाई मंदिर समोर बडव्यांच्या मळा परिसरात आनंदा नारायण गांजणे यांची शेतात घर आहे. या ठिकाणी गुरुवारी रात्री बिबट्याने झडप घालत जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्यावर  हल्ला केला. यामध्ये विदेशी जातीच्या  कुत्र्याचा मुत्यु झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. कुत्र्याचे धड उसाच्या  शेतात पोट फाडून खाल्लेल्या अवस्थेत आढळून आले. या ठिकाणच्या पाऊलखुणा व कुत्रा खाण्याची पध्दत  यावरून बिबट्याची असल्याचा दुजोरा रेस्कु टिमचे सदस्य  व प्राणी मित्रांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाघजाई मंदिर परिसरात बिबट्याचे पायांचे ठसे, तसेच मेंढी, कुत्री मेल्याची  घटना घडल्या आहेत. या ठिकाणी मेंढपाळ आनंदा गांजणे यांची वस्ती असुन या ठिकाणी शेकडो मेंढ्या  आहेत. भक्ष्याच्या शोधात या परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने दिसून आला आहे. पंधरा दिवसांपूर्वी सागवान  नावाच्या शिवारालगत मेंढपाळाची एक मेंढी खाल्याचे निदर्शनास आले होते. तर परिसरातील अनेक भटकी कुत्री गायब असल्याचे दिसून आले आहे. वनविभागाच्या पथकाने बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी ड्रोनच्या सहाय्याने परिसराची तपासणी सुरू केली आहे. पाळीव प्राणी  पाळताना खबरदारी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.