मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा अध्यादेश मागे घेतल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज 20 वर्षानंतर पहिल्यांदा एकाच मंचावर आले. दोन्ही नेत्यांनी विजयी मेळावा घेतला. या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी मराठी भाषेवरून सुरू असलेल्या राजकारणावर जोरदार टोलेबाजी केली. तसेच त्यांनी दोन दिवसांपूर्वी मीरा भाईंदर इथं गुजराती व्यापाऱ्याला मारहाण झालेल्या प्रकरणावर भाष्य केलं.
यावेळी राज ठाकरे यांनी मारहाण करणाऱ्या मनसैनिकांचं समर्थन केलं. पण उठसूठ कुणालाही मारायचं नाही, असा सल्लाही दिला. पण जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे, असा कानमंत्रही राज ठाकरे यांनी दिला. दरम्यान त्यांनी आपल्या एका गुजराती मित्राबद्दल सांगितलं. संबंधित गुजराती मित्र उत्कृष्ट मराठी बोलतो, पुलं देशपांडे ऐकतो, असंही राज ठाकरेंनी सांगितलं.
राज ठाकरे भाषणात काय म्हणाले?
काल कुणीतरी व्यापाऱ्याच्या कानफडात मारली. त्याच्या कपळावर गुजराती लिहिलं होतं का? बाचाबाचीमध्ये समोरचा व्यक्ती गुजराती निघाला. म्हणजे गुजरात्यांना मारलं का? मुंबईत किती गुजराती व्यापारी आहेत. अजून तर काहीच केलं नाही अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे. यात काही वाद नाही. पण विनाकारण उठसूट कुणाला मारहाण करायची गरज नाही. पण जर कुणी जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे, पण चूक त्यांची पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे पुढे म्हणाले, अशी मारहाण करत असाल तर त्यांचे व्हिडीओ काढू नका. आपल्या आपल्यात त्यांना कळलं पाहिजे. मारणारा कधी सांगत नसतो, मार खाणारा सांगत असतो. मला मारलं…. मला मारलं…मुंबईत अनेक गुजराती लोक आहेत. अनेकजण माझ्या परिचयाचे आहेत. माझे मित्र आहेत. माझे एक मित्र नयन शाह आहेत. त्याला मी गुज’राठी’ म्हणते. तुमचा विश्वास बसणार नाही, पण इतका अप्रतिम मराठी बोलतो. त्याच्या भाषेला विनोदाचाही अंग आहे. तो शिवाजी पार्कात फिरताना कानाला हेडफफोन लावून पुलं देशपांडे ऐकणारा गुजराती आहे. मराठीचं बाळकडू आमच्यासाठी बाळकडूच होतं.
