Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

राज्य सरकारनं हिंदी भाषा सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर आज शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांचा मराठी विजयी मेळावा होत आहे. या मेळाव्याला तब्बल वीस वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आले आहेत. त्यामुळं दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकलेले आहेत. या दोघांवर मराठीबाबत शंका घेऊ शकता का? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुलांना इंग्रजी माध्यमांमध्ये शिक्षण दिलं असल्याचं सांगितलं. त्याला आज राज ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

आडवाणींच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का? : आजच्या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, ”आम्ही मराठी मीडियात शिकलो, हो शिकलो. आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली. होय. मग यांना मराठीचा पुळका कसा? बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकलेले आहेत. या दोघांवर मराठीबाबत शंका घेऊ शकता का? लालकृष्ण आडवाणी सेंट पॅट्रीक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले. कॉन्व्हेंटमध्ये शिकले. मग, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?,” असा सवाल राज ठाकरेंनी केला.

जातीपातीत विभागायला सुरू करतील : ”दक्षिण भारतात बघा. त्यांना कोण विचारत नाही. उद्या हिब्रू भाषेत शिकेल आणि मराठीचा कडवट अभिमान बाळगेल. मग काय अडचण आहे? भाषावार प्रांत रचना यासाठीच झाली ना की, आपापल्या भाषेचा अभिमान हवा. आताच सांगतो. आज मराठी म्हणून एकत्र आलात. राजकारण करून आता तुम्हाला जातीत विभागतील. जातीचं कार्ड खेळतील. मराठी म्हणून तुम्हाला एकत्र येऊ देणार नाही. जातीपातीत विभागायला सुरू करतील”, असा इशाराही राज ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. आमच्याकडे सत्ता आहे, ती रस्त्यावर : ”आजचा हा मेळावा. मोर्चालाही तीच घोषणा होती. आताही तिच आहे. कोणताही झेंडा नाही. मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेनं पाहायचं नाही कुणी? खरंतर हा प्रश्नच अनाठायी होता. गरज नव्हती. कुठून हिंदीचं आलं ते कळलं नाही. हिंदी. कशासाठी हिंदी? कुणासाठी हिंदी. लहान लहान मुलांवर जबरदस्ती करताय तुम्ही. कुणाला विचारायचं नाही. शिक्षण तज्ज्ञांना विचारायचं नाही. तुमच्याकडे सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे, ती रस्त्यावर,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारलं.