मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक नवा अध्याय सुरू झाला आहे. जवळपास 20 वर्षांनंतर उद्धव आणि राज ठाकरे एकाच राजकीय मंचावर एकत्र आले आहेत. या मराठी विजयी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी एक मोठं आणि सूचक वक्तव्य केलं. ”आम्ही एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यांनी एकत्र राहण्याचा निश्चय यावेळी बोलून दाखवला.
विजयी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ”बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी राजकीय व्यासपीठावर भेट आहे. सन्माननीय राज ठाकरे असा उल्लेख करतो. राज यांनी अतिशय चांगली मांडणी केली आहे. आज भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे. आमच्या दोघांतील ‘अंतरपाट’ अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहे, एकत्र राहण्यासाठी.”
‘आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू’ : तत्पूर्वी, उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना सांगितलं, ”मला आज कल्पना आहे, अनेक बुवा महाराज व्यग्र आहेत, कोण लिंबू कापतंय? कोण रेडा कापतोय? माझ्या आजोबांनी या भोंदूपणाविरोधात लढा दिला होता आणि त्याच्यासाठी आज आम्ही एकत्र आलो आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं, असं यांचं काम आहे, आता आम्ही दोघं तुम्हाला फेकून देऊ. तुमच्या डोक्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा हात नसता, तर आज तुम्ही कुठे असता? मधल्या काळात यांनी सुरू केलं होतं उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. अरे आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत.”
‘तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे सत्ता रस्त्यावर’ : विजयी मेळाव्याची सुरुवात राज ठाकरे यांच्या भाषणानं झाली. राज यांनी आपल्या भाषणात सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. या विजयी मेळाव्यात बोलताना राज यांनी सांगितलं, ”आजच्या मेळाव्याची घोषणा ‘कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा’ हीच आहे. मराठीकडे कुणी वाकड्या नजरेनं पाहायचं नाही. तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात आणि आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर. एकेदिवशी शिक्षणमंत्री दादा भुसे माझ्याकडे आले होते आणि म्हणाले की, आम्ही काय सांगत आहोत ते ऐकून घ्या. मी म्हणालो ऐकून घेईन पण ऐकणार नाही. मला म्हणे केंद्राच्या शिक्षण धोरणात हिंदी मुद्दा आहे. पण दक्षिणेतील राज्य यांना विचारत पण नाहीत. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान इथं तिसरी भाषा कोणती घेणार? मराठीच तिसरा विषय घ्यायला हवा. एक भाषा उभी करायला प्रचंड ताकद लागते. भाषा अशाच उभ्या राहात नसतात. ”
