Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

राज्य सरकारनं त्रिभाषा धोरण मागे घेतल्यानंतर आणि हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मोर्चाऐवजी शनिवारी विजय मेळावा मुंबईतील वरळी इथं पार पडणार आहे. या विजयी मेळाव्यासाठी मागील काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरदार तयारी सुरू होती. मराठी विजयी मेळाव्यासाठी नियोजन म्हणजे कोण कुठं बसणार? कोणाची भाषणं होणार? आणि दुसऱ्या पक्षातील नेते आले तर त्यांची व्यवस्था कशी असेल? याबाबत दोन्ही पक्षांकडून नियोजन सुरू होतं. अखेर शनिवारी मराठीचा विजयी मेळावा पार पडत असताना शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये उत्साह असल्याचं पाहायला मिळत आहे. या मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिक मुंबईत दाखल होत आहेत.

महाराष्ट्रात परिवर्तन घडेल : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उण्यापुऱ्या वीस वर्षांनंतर एकत्र येत आहेत. त्यामुळं शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. जे महाराष्ट्रद्रोही आहेत. ज्यांनी महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला नेऊन ठेवले. त्या महाराष्ट्रद्रोहींना ठाकरे बंधू नक्कीच धडा शिकवतील. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल वीस वर्षानंतर एकत्र येत आहेत. त्यामुळं महाराष्ट्राला न्याय मिळेल. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं महाराष्ट्रात परिवर्तन नक्कीच दिसून येईल, अशा भावना शिवसैनिक आणि मनसैनिकांनी व्यक्त केल्या आहेत. मेळाव्याच्या ठिकाणी पोस्टरबाजीच्या माध्यमातून ही टीका करण्यात आली आहे.

हा दिवस आमच्यासाठी सण : ”या मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील हजारो लोक दाखल झाले आहेत. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन मार्गदर्शन करतील. या सोहळ्यासाठी आम्ही उत्सुक आहे. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र यावेत अशी आमची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. मधल्या काही वर्षामध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या हालचाली झाल्या. परंतु काही कारणांमुळ ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत. परंतु ठाकरे बंधू आता मराठी भाषेच्या एकत्र आलेत. हा दिवस आमच्यासाठी सण आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.