मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मराठी जनतेला ज्या क्षणाची उत्सुकता आहे तो ठाकरे बंधूंचा मेळावा आज मुंबईत होत आहे. राज्यात हिंदी सक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत हा दिवस आमच्यासाठी सण आहे. अशी भावूक प्रतिक्रिया शिवसेना – उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत होणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मेळाव्याआधी दिली.
राज्य सरकारनं रद्द केला अध्यादेश : राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीवरून वातावरण चांगलंच तापलं होतं. महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीची सक्ती नको अशी भूमिका अनेक पक्षांनी आणि संघटनांनी घेतली होती. मनसेनं हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर मोठं आंदोलन केलं. त्यानंतर या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उडी घेतली. हिंदी सक्ती विरोधात शनिवारी (5 जुलै) मोठा मोर्चा निघणार होता. या मोर्चामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सहभागी होणार होते. परंतु, याआधीच राज्य सरकारनं त्रिभाषा सुत्राबाबतचे दोन्ही अध्यादेश रद्द केले. त्यामुळं हा मोर्चा मागं घेण्यात आला. परंतु, ठाकरे बंधूं ‘मराठी विजयी मेळावा’च्या निमित्तानं बरयाच वर्षांनी राजकीय पटलावर एकत्र येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मराठी विजयी मेळाव्याबाबत बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. ”देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झाला नाही तेव्हा शिवसेनेचा जन्म झाला होता. हा ठरवून केलेला कार्यक्रम नाही. तर राज्य सरकारनं त्रिभाषा सुत्राबाबत दोन्ही अध्यादेश रद्द केले. त्यामुळं हा मराठी विजयी मेळावा होत आहे.”
हा दिवस आमच्यासाठी सण : ”या मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील हजारो लोक दाखल झाले आहेत. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन मार्गदर्शन करतील. या सोहळ्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र यावेत अशी आमची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. मधल्या काही वर्षामध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या हालचाली झाल्या. परंतु काही कारणांमुळ ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत. परंतु ठाकरे बंधू आता मराठी भाषेच्या मुद्द्यांवरुन एकत्र आलेत. हा दिवस आमच्यासाठी सण आहे,” असं म्हणत संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
