मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
राज्य सरकारनं हिंदी भाषा सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर आज शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांचा मराठी विजयी मेळावा होतोय. या मेळाव्याला तब्बल वीस वर्षांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रमुख व्यक्तिमत्त्वं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र येतायेत. वरळी डोम येथील आयोजित विजय मेळाव्यासाठी हे दोन्ही ठाकरे बंधू सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, सत्तेच्या राजकारणामुळं एकेकाळी दुरावलेले हे भाऊ आता पुन्हा एकत्र दिसणार असल्यानं आणि ते काय भाष्य करणार? , याकडं सर्वांचं लक्ष असणार आहे.
वरळी डोमबाहेर मोठी गर्दी : वरळी डोमच्या प्रवेशद्वारावर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालीय. वरळी डोम पूर्णपणं भरलं असून आत प्रवेश मिळवण्यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. सभागृहात प्रवेश करण्यासाठी कार्यकर्ते डोमबाहेर थांबले आहेत. त्यामुळं तिथं गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. गेटवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. तसंच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठी वरळी डोम परिसरात पोलिसांची अधिक कुमक मागवण्यात आली आहे. पोलिसांची एक व्हॅन घटनास्थळी दाखल झाली आहे. दरम्यान, वरळी डोम पूर्णपणं भरल्यानं आत प्रवेश नाकारला जात आहे. मात्र, ”गर्दी कमी दाखवण्यासाठी आम्हाला पोलीस आतमध्ये जाऊन देत नाहीत,” असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. ठाकरे बंधू युती करणार का? : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विजयी मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत युती करणार का? असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यामागे मराठी भाषेवरील प्रेम हेच प्रमुख कारण असल्याचं मानलं जातंय. महाराष्ट्र सरकारनं त्रिभाषा धोरणाबाबत एक आदेश जारी केला होता, ज्यावरून मोठा वाद निर्माण झाला. या आदेशाला दोन्ही ठाकरे बंधूंनी तीव्र विरोध दर्शवला. विरोधामुळं सरकारनं आपल्या आदेशावर ‘यू-टर्न’ घेतला आणि हिंदी सक्तीबाबतचा आदेश रद्द केला. त्यानंतर सरकारच्या या निर्णयाला आपला आणि मराठी भाषेचा विजय मानत आज हा ‘विजयी मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.
