Spread the love

अमरावती / महान कार्य वृत्तसेवा

तालुक्यातील सुरवाडी खुर्द शेत शिवार परिसरात एका 13 फूट लांबीच्या अजगराने 20 किलो वजनाची बकरी गिळण्याचा प्रयत्न केला. ही माहिती सर्पमित्राला मिळताच त्यांच्या अथक प्रयत्नाने अजगराचे प्राण वाचले. मात्र बकरीला यात जीव गमवावा लागला. तालुक्यातील सुरवाडी येथील शेत शिवारात एका 13 फूट अजगराने बकरीला शिकार बनवण्याचा प्रयत्न केला.

सुरवाडी खुर्द शेत शिवारात परिसरातील भूषण भोंबे यांच्या बकऱ्या नेहमीप्रमाणे आजही चरण्यासाठी गेल्या होत्या. त्याच भागात भला मोठा अजगर दडून बसला होता. अजगराने बकरीवर झडप घालून तिला गिळण्यासाठी विळखा घातला. विळखा मारल्याने अजगराला कमालीचा त्रास होत होता. ही बाब काही लोकांच्या निदर्शनास येताच त्यांनी ही माहिती सर्पमित्र अविनाश पांडे यांना दिली. पांडे यांनी अजगराच्या तावडीतून त्या बकरीला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु, बकरीचा यात जीव वाचला नाही. मात्र, अजगराचे प्राण वाचवण्यात ते यशस्वी झाले. सर्पमित्र अविनाश पांडे यांनी अजगराला सुरक्षितपणे पकडल्यानंतर वन विभागात नोंद करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.