Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

वरळी डोममध्ये झालेल्या शिवसेना आणि मनसेच्या विजयी मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी मुंबई वेगळी करण्याचा कट असल्याचा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. वरळीमधील कार्यक्रमात पहिल्यांदा भाषण करताना राज ठाकरेंनी आम्ही विरोध केल्यानेच हिंदीसंदर्भातील निर्णय मागे घेतला असं राज ठाकरे म्हणाले.

”तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात! आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. एक पत्र लिहिलं, दोन पत्र लिहिली. नंतर ते दादा भुसे माझ्याकडे आले. आम्ही काय म्हणतोय एवढं समजून तर घ्या. एवढं काय म्हणतोय ऐकून तर घ्या. तुम्ही सांगताय ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही. मराठीच्या विषयात तुम्ही तिसरी भाषा लादत आहात. कुठलं त्रिभाषा सूत्र जेव्हा आलं ते केवळ सेंट्रल गव्हर्मेंट आणि राज्य सरकारमधील संवादासाठी आणलं होतं,” अशी आठवण राज यांनी करुन दिली.

”कोर्टात सगळ्या गोष्टी इंग्रजीत होतात. केंद्रातच्या शिक्षण धोरणात, इतर राज्यातही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करुन पाहिला. दक्षिणेतली राज्य यांना विचारत नाहीत. महाराष्ट्र पेटून उठतो तेव्हा काय घडतं हे राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली?” असा सवाल राज यांनी उपस्थित केला.

”विनाकारण आणण्याचा हा विषय होता. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश कोणती तिसरी भाषा आणणार आहात? खरं तर आणली पाहिजे. गंमत बघा, हिंदी भाषिक राज्य आर्थिक दृष्ट्‌‍या मागास. हिंदी न बोलणारी राज्य मागास वरुन आम्ही हिंदी शिकायचं. यांना हिंदीत राज्य संभाळता आली नाही. विकास नाही करता आला. हिंदी बोलणाऱ्या राज्यांतून लोक इकडे येतात मग हिंदी कोणासाठी शिकायचं पोरगा हिंदी चित्रपटसृष्टीत जाणार का? कोणतीही भाषा चांगलीच असते. माझा हिंदीला विरोध नाही. भाषा उभी करायला प्रचंड कष्ट असतं,” असं राज म्हणाले.

”ज्याला इंग्रजी येतं त्याला लाज वाटेल इंग्रजी येतं असं अमित शाह म्हणाले. अरे तुम्हाला नाही येत,” असा खोचक टोला राज यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना लगावला. ”या हिंद प्रांतावर 125 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. इतक्या राज्यांवर आम्ही राज्य केलं. आम्ही मराठी लादली? गुजरातवर, मध्य प्रदेश, पंजाबवर, अटकपर्यंत पोहोचलेलं मराठी आम्ही लादलं? 200 वर्षांपूर्वीची भाषा महाराजांच्या काळातही नव्हती. कशासाठी, कोणासाठी करायचं?” असा सवाल राज यांनी केला. हिंदी भाषेसंदर्भातील धोरणावरुन राज यांनी सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिलं आहे. ”यांनी फक्त चाचपडून पाहिलं. मुंबई स्वतंत्र करता येते का अधी थोडं भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कोणाची माय व्यायली असेल त्याने महाराष्ट्राला, मुंबईला हात घालून दाखवावं,” असं राज यांनी म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. ”मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांङ नाही आहोत,” असंही राज म्हणाले.