मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मी आणि राज ठाकरे एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी असं सांगत उद्धव ठाकरेंनी सूचक विधान केलं आहे. आज आमच्या भाषणांपेक्षा एकत्र दिसणं महत्वाचं आहे. ज्यांनी मराठीसाठी पक्षभेद विसरुन वज्रमूठ दाखवली त्या सर्वांचे आभार मानतो असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. राज्य सरकाराने हिंदी भाषा शिकवण्यासंदर्भातील जीआर रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून नियोजित मोर्चा रद्द करत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर वरळीतील डोम येथे शिवसेना आणि मनसेच्या समर्थकांसह सर्वसामान्यांनी तुफान गर्दी केली आहे.
सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधव, भगिनी आणि मातांनो असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाषणाला सुरुवात केली. ”बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी व्यासपीठावर भेट झाली. त्याने मला सन्माननीय उद्धव ठाकरे म्हटलं आहे. आणि साहजिकपणे त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलं आहे. राजने अप्रतिम मांडणी केला आहे. माझ्या भाषणाची मला गरज वाटत नाही. आजच्या कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर सर्वांचं लक्ष या भाषणांकडे आहे. पण आज आमच्या भाषणांपेक्षा एकत्र दिसणं महत्वाचं आहे. ज्यांनी मराठीसाटी पक्षभेद विरुन वज्रमूठ दाखवली त्या सर्वांचे आभार मानतो”.
आमच्या दोघात जो काही अंतरपाट होता तो अनाजी पंतांनी अंतर दूर केला. आता अक्षता टाकण्याची काही अपेक्षा नाही असा टोला त्यांनी नाव न घेता फडणवीसां लगावला. एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठी असं सूचक विधान यावेळी त्यांनी केलं.
पुढे ते म्हणाले, ”अनेक बुवा महाराज व्यग्र आहेत. कोण लिंब मारतंय, कोण टाचं मारतंय, कोणी गावी जाऊन अंगारे धुपारे करत असेल, रेडे कापत असतील. या सगळ्यांना सांगतो, आमच्या आजोबांनी या भोंदूगिरीविरोधात लढा दिला होता. आम्ही त्यांचे वारसदार म्हणून तुमच्यासमोर उभे ठाकले आहोत”.
”हे सगळं आपणच करुन ठेवलं आहे. भाषेवरुन एखादा विषय निघतो तेव्हा तो वरवरचा धरुन चालणार नाही. मधल्या काळात राज, मी आणि आपण सर्वांनाी या नतद्रष्टांचा अनुभव घेतला आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. आजपर्यंत वापर करुन घेतलात, डोक्यावर शिवसेनाप्रमुख नसते तर तुम्हाला या महाराष्ट्रात कोण ओळखत होतं? कोणत्या भाषेत बोलत होतात?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.
”राज तू सगळ्यांची शाळा काढली, मग मोदींची शाळा कोणती? सगळ्यात उच्चशिक्षित आहेत. भाजपा अफवांची फॅक्टरी आहे. मधल्या काळात उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असं सुरु केलं होतं. हिंदुत्त्व भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा जास्त कडवट कट्टर देशभिमानी हिंदू आहोत. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवत आहात? 92-93 साली जे काही घडलं होतं, तेव्हा मुंबईतल्या अमराठींनाही हिंदू म्हणून शिवसैनिकांनी वाचवलं आहे”, असंही त्यांनी सांगितलं.
”फडणवीस म्हणालेत की, भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही. जर महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागण्यासाटी आंदोलन करत असेल आणि तुम्ही गुंड म्हणत असला तर आम्ही गुंड आहोत. न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाही, आणि गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करुच,” असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
”देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाने मला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवेळी स खा पाटील यांनी केलेल्या विधानाची आठवण करुन देत आहे. जो दिल्लीत बसतो त्याचे पाय चाटणारे येथील राज्यकर्ते त्यांना मी बाटगे म्हणतोय. मुंबई मराठी माणसाने मिळवली आहे. तेव्हा काँग्रेस सत्तेत होती. मुंबई मराठी माणसाला द्यायला तयार नव्हते. तुम्ही नुसते नावाने मराठी आहात. तुमच्या अंगात मराठी रक्त आहे की नाही हे तपासावं लागेल,” असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
पुढे ते म्हणाले, ”कशासाठी हा घोळ घातला जात आहे? देश एक, संविधान एक आणि निशाणही एकच असलं पाहिजे. तो तिरंगा हवा, भाजपाचं भांडी पुसायचं फडकं नको अशी टीका त्यांनी केली. एक देश, एक निवडणूकच्या माध्मयातून हिंदी, हिंदू, हिंदुस्तान याचा प्रयत्न आहे. हिंदू, हिंदुस्तान मान्य आहे, पण हिंदीची सक्ती मान्य नाही. तुम्ही कितीही कमिट्या केल्या, हिंदीची सक्ती 7 पिढ्या उतरत्या तरी लागू देणार नाही”.
उद्धव ठाकरेच्या काळातील असं ओरडत आहे. इतकं काम करत असताना गद्दारी करुन मला का पाडलं? अशी विचारणा त्यांनी केली. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मराठीची सक्ती केली याचा अभिमान आहे असंही ते म्हणाले.
”मराठीचे दुश्मन कोण आहेत? महाराष्ट्रात मराठीची सक्ती केल्यानंतर काहीजण कोर्टात गेले ती गुंडगिरी होत नाही का? तो केडिया यांचीच पिल्लावळ आहे. तोडा, फोडा आणि राज्य करा. शिवसेनेने आजपर्यंत काय केलं अशी विचारणा करत आहेत. आता राज मी तुला माझ्यासोबत घेतो. आपण तेव्हा एकत्र होतो आणि आता पुढेही एकत्रच आलो आहोत. तुम्ही मुंबई आणि महाराष्ट्राचे लचके तोडले. महाराष्ट्रातून उद्योगधंदे पळवले, आर्थिक केंद्रं गेलं, हिरे व्यापार गेला, मोठी ऑफिस गेली. आम्ही सगळं करत होतो पण तुम्ही गद्दारी करुन सरकार पाडलं. तुमचे जे दोन व्यापारी मालक तिथे बसले आहेत त्यांचे बूट चाटण्यासाठी तुम्ही हे करत आहात,” असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
पुढे ते म्हणाले ”आपल्या दोघांमध्ये भांडण लावून, नतद्रष्ट डोक्यावर बसत आहेत. हे किती काळ सहन करायचं आहे? प्रत्येक वेळी काही झालं की भांडणं लावायची. आताही तेच होणार. म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? काहीजण म्हणतात यांचा म मराठीचा नाही तर महापालिकेचा आहे. नुसता महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचाही आहे. आम्ही महाराष्ट्र काबीज करु”.
”आज तर निवडणुका नाहीत. सत्ता येते आणि जाते, पण आपली ताकद एकजुटीत असली पाहिजे असं बाळासाहेबांनी सांगितलं आहे. संकट आलं की आपण मराठी एकवटतो, आणि संकट गेलं की आपणच एकमेकांत भांडू लागतो. आता हा नतद्रष्टपणा अजिबात करायचा नाही. गेल्या विधानसभेत त्यांनी बटेंगे तो कटेंगे केलं. हिंदू मुसलमान तर केलंच, पण खासकरुन मराठींमध्ये केलं. यांची निती अशीच आहे. गुजरातमध्ये पटेलांना एकत्र केलं. हरियाणात जाट एकत्र केले आणि महाराष्ट्रात मराठ्यांना उचकवलं आणि मराठेतर एकत्र केला. त्यांच्यात भिती निर्माण केली. मराठी माणूस मराठी माणसाशी भांडला आणि दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावर राज्य करु लागले आणि आपण त्यांच्या पालख्या वाहायच्या. पालख्यांचे भोई होणार की कधीतरी माय मराठीला पालखीत सन्मानाने बसवणार आहात?”, अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.
