Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केले की दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात कोणतीही संशयास्पद माहिती नाही. हे आत्महत्येचे प्रकरण आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचे 9 जून 2020 रोजी मालाडमधील इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून निधन झाले. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या एसआयटी (विशेष तपास पथक) किंवा सीबीआय कडून करावी अशी मागणी केली. आता महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले आहे की दिशा सालियन (28) यांच्या मृत्यूमध्ये कोणत्याही प्रकारच्या संशयाला वाव नाही. तसेच, आदित्य ठाकरे देखील निर्दोष आहेत. या प्रकरणावरून आता पुन्हा आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. भाजप आमदार राम कदम यांनी दिशा सालियन प्रकरणात माफी मागायची असेल तर तत्कालीन ठाकरे सरकारनं हात जोडून माफी मागावी. कारण पुरावे नष्ट करण्याचे काम केले गेले आहे. दिशा सालियन यांच्या वडिलांची त्यांनी माफी मागायला पाहिजे, असं म्हणत ठाकरेंना डिवचलं आहे.

दिशा सालियान प्रकरणात षडयंत्र रचत कोणाला वाचवायचं होतं हे जगाला माहिती आहे. वाझे सारखे प्यादे त्यांच्याकडे होते. उद्धव ठाकरेंसारखे मुख्यमंत्री होते. कोणाला वाचवायचं होतं? दिशा सालियनचे वडील खोटे असू शकत नाही. पुरावे नष्ट करण्याचे काम ठाकरेंच्या काळात झालं आहे. साधू हत्याकांड, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात पुरावे नष्ट झाले आहेत. कोणालाही न्याय मिळाला नाही, असंही पुढे राम कदम यांनी म्हटलं आहे. तर या प्रकरणामध्ये भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे माफी मागणार का? या प्रश्नावर उत्तर देताना राम कदम म्हणाले, माफी मागायची असेल तर तत्कालीन ठाकरे सरकारनं हात जोडून माफी मागावी. कारण पुरावे नष्ट करण्याचे काम केले गेले आहे. दिशा सालियानच्या वडिलांची माफी मागायला पाहिजे त्यांनी, असंही पुढे राम कदम यांनी म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

दिशा सालियनच्या गूढ मृत्यूचे प्रकरण अतिशय गाजलेले आणि वादग्रस्त आहे. 2022 मध्ये महाराष्ट्र विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. शिवसेनेचे (शिंदे गटाचे) आमदार भरत गोगावले आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियनच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला आणि चौकशीची मागणी केली. या मुद्द्‌‍यावरून सभागृहात आमदारांमध्ये बराच गोंधळ झाला होता. या प्रकरणात, नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणीही केली होती. दिशा सॅलियन एक सेलिब्रिटी मॅनेजर होती. तिने वरुण शर्मा, सुशांत सिंग राजपूत, भारती सिंग सारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले.

आदित्य ठाकरेंवर याचिकेतून गंभीर आरोप प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या जबाबानुसार, 8 जून 2020 च्या त्या रात्री दिशाच्या मालवणी येथील घरात तिच्या जवळच्या मित्रांसह एक पार्टी सुरू होती, मात्र अचानक तिथं आदित्य ठाकरे, त्यांचा एक अंगरक्षक, सूरज पांचोली, दिनो मौर्या ही मंडळी दाखल झाली आणि त्या पार्टीचा माहोलच बदलला. याच लोकांनी दिशाचा सामूहिक बलात्कार केल्याचा गौप्यस्फोटही सालियन यांचे वकील नीलेश ओझा यांनी वारंवार केलेला आहे. या घटनेनंतर दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासात टाकणारं होतं म्हणून तिला कायमचं शांत करण्यात आलं. या घटनेनंतर अनेक राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी अचानक सक्रिय झाले होते. या घटनेनंतर आदित्य ठाकरेंनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवरून सतत संपर्कात होते. याशिवाय दिशाच्या जवळच्या काही व्यक्तींनाही त्यांनी अनेक फोनकॉल्स केले. दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुशांससिंह राजपूत याचाही मृत्यू झाला याच कालावधीत सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीसोबत आदित्य ठाकरेंनी 44 वेळा फोनवर बोलणं केल्याचाही आरोप याचिकेत आहे.