Spread the love

नाशिक / महान कार्य वृत्तसेवा

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये ठाकरे गटातील नेते आपल्या बाजूला वळवून घेण्याचा सपाटा लावलेला भाजप पक्ष गुरुवारी आणखी एक मोठा धमाका करण्याच्या तयारीत होता. भाजपने ठाकरे गटाचे नेते सुनील बागूल आणि महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्या गळाला लावल्याची चर्चा रंगली होती. यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकेची झोड उठवत राजकीय साधनशुचिता आणि पोलीस यंत्रणेच्या गैरवापराचा मुद्दा अधोरेखित केला होता. यानंतर आता भाजपने सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा पक्षप्रवेश तुर्तास थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा आज दुपारी होणारा पक्षप्रवेश लांबणीवर पडला आहे.

चार दिवसांपूर्वीच विलास शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील महानगरप्रमुख पदाची जबाबदारी मामा राजवाडे यांच्या खांद्यावर सोपवली होती. मात्र, भाजपने त्यांनाच गळाला लावल्याने नाशिकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. मामा राजवाडे यांना ठाकरे गटाने महानगरप्रमुख केल्यानंतर नाशिक पोलिसांनी एका मारहाणप्रकरणात सुनील बागुल आणि राजवाडे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांची पथकं या दोघांना शोधत होती. मात्र, हे दोघेही पोलिसांच्या हाती लागले नव्हते. दुसरीकडे या दोघांकडून अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरु होते. तो मिळेपर्यंत बागुल आणि राजवाडे अज्ञातवासात होते. त्यामुळे पोलिसांच्या दप्तरी या दोघांची नोंद फरार अशी झाली होती. परंतु, गुन्हा दाखल झालेल्या या दोघांना भाजप आज पावन करुन घेणार ही बातमी समोर येताच राजकीय वतुर्ळात त्याची चर्चा रंगली होती. फरार असलेल्या आरोपींचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यास राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यामुळे मतदार आणि समाजात भाजपविषयी चुकीचा संदेश जाण्याची शक्यता होती. या सगळ्याचा सारासार विचार करुन भाजप नेतृत्त्वाने तुर्तास सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती दिल्याची माहिती समोर आली आहे.

सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या जामीन अर्जावर 5 जुलैला सुनावणी होणार आहे. तोपर्यंत भाजपकडून वाट पाहिली जाऊ शकते. न्यायालयाकडून सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्याबाबत काय निरीक्षण नोंदवले जाते, हेदेखील पाहावे लागेल. मात्र, तोपर्यंत या दोन्ही नेत्यांना कमळ हाती धरण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. या सगळ्यांमुळे नाशिकमधील राजकारण सध्या रंगतदार अवस्थेत पोहोचले आहे. मामा राजवाडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर ठाकरे गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मामा राजवाडे यांची महानगरप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने प्रथमेश गीते यांची नाशिक महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जय महाराष्ट्र!, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.