पुणे / महान कार्य वृत्तसेवा
राज्याची सांस्कृतिक राजधानी पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेनं हादरली आहे. कुरिअर डिलिव्हरी बॉय असल्याचं भासवून नराधमानं 22 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कोंढवा येथं घडली आहे. आरोपीनं कुरियर डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगत अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यानं पीडितेवर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.
पुणे शहरातील कोंढवा भागातील एका गृहनिर्माण सोसायटीत बुधवारी संध्याकाळी पीडितेवर अत्याचार झाल्याची घटना घडली. पीडिता एका कंपनीत काम करते. ती अपार्टमध्ये एकटी असताना कुरिअर डिलिव्हरी एजंट असल्याचं भासवून आरोपीनं तिच्या घरात प्रवेश मिळिवला. कुरिअर दिल्यानंतर कागदपत्रावर सही करण्यासाठी त्यानं पीडितेकडं पेन मागितला. पीडिता मागे वळताच तो अचानक घरात आला. त्यानंतर आरोपीनं दार बंद करून गुन्हा केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यानं दिली.
आरोपीचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद- रात्री 8.30 च्या सुमारास शुद्धीवर आल्यानंतर तरुणीला काहीही आठवलं नाही. त्यानंतर तरुणीनं घडलेल्या घटनेची माहिती नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली.आरोपीनं पीडितेला बेशुद्ध करण्यासाठी गुंगी आणणारा पदार्थ वापरला असण्याची शक्यता आहे. आरोपीनं पीडितेला बेशुद्ध करण्यासाठी काही स्प्रे वापरला आहे का? याबाबत पोलीस तपास करत आहेत. आरोपीचा चेहरा परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजवरून त्याचा शोध घेण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकाऱ्यानं सांगितलं.
दहा पथकांकडून तपास सुरू- आरोपीनं महिलेचा सेल्फी काढून परत अपार्टमेंटमध्ये येण्याची धमकी दिली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे पाच आणि झोनलचे पाच असे एकूण 10 पथक या प्रकरणावर काम करत आहेत. फॉरेन्सिक तज्ञांना घटनास्थळी बोलावण्यात आले. महिलेच्या फोनमध्ये एक सेल्फी सापडला आहेत. त्यावरूनदेखील तपास करण्यात येत आहे. आरोपीला पकडण्यासाठी स्केच बनविण्याचं काम सुरू आहे.
