नवी मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
‘माता नव्हे तू वैरिणी’ ही उक्ती खरी ठरवत 15 दिवसाच्या तान्हुल्याला रेल्वे स्थानकात सोडून एका महिलेनं पलायन केलं आहे. सीएसएमटी पनवेल लोकलमध्ये 15 दिवसांच्या तान्ह्या बाळाला सहप्रवासी तरुणींच्या हातात देत महिला फरार झाल्याची घटना नवी मुंबई शहरात घडली आहे. संबधित फरार महिलेविरोधात भारतीय दंड संहिता कलम 93 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मदतीच्या बहाण्यानं बाळ दोन तरुणींच्या हातात दिलं : हार्बर रेल्वेमार्गावरील सीवूड्स स्थानकात सोमवारी (30 जून) दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला. सीएसटीहून पनवेलकडं जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका अनोळखी महिलेनं तिच्या अवघ्या 15 दिवसांच्या तान्ह्या बाळाला सहप्रवासी तरुणीच्या हातात देऊन फरार झाली. संबधित महिला अंदाजे 30 ते 35 वयोगटातील आहे. तिनं मदतीच्या बहाण्यानं बाळ दोन तरुणींच्या हातात दिलं. संबधित प्रकार नवी मुंबईतील सीवूड्स रेलवे स्थानकात घडला.
काय आहे प्रकार : नवी मुंबईतील जुईनगर इथं राहणारी दिव्या नायडू (19) आणि तिची मैत्रीण भूमिका माने (20) या दोघी चेंबूरहून लोकल ट्रेननं घरी जात होत्या. त्याच वेळी लोकल ट्रेनमध्ये एक अनोळखी महिला त्यांना सानपाडा स्थानकात भेटली. ”माझ्याकडं बाळ आणि बरचसं सामान देखील आहे. मला सीवूड्स रेल्वे स्थानकात उतरायचं आहे. बाळ हातात असल्यानं मला ट्रेनमधून उतरण शक्य नाही. त्यामुळे तुम्ही मला बाळाला घेऊन उतरण्यासाठी मदत कराल का?” असं सांगत तिनं त्या दोघींकडे मदत मागितली. सीवूड्स रेल्वे स्थानन आल्यानंतर महिलेनं बाळ त्यांच्या हातात दिलं. मात्र, संबधित महिला स्वत: लोकलमधून उतरलीच नाही. सुरवातीला हातात जास्त सामान असल्यानं महिलेला लोकलमधून उतरायला जमत नसेल, असा या दोन्ही तरुणींचा समज झाला. मात्र, बराच वेळ वाट बघूनही संबंधित महिला परतली नाही. त्यानंतर अखेर त्या दोन तरूणींनी बाळाला घेऊन वाशी रेल्वे पोलिसांकडं तक्रार दाखल केली.
महिलेविरोधात भारतीय दंड संहिता कलम 93 अंतर्गत गुन्हा दाखल : आपल्या तान्हुल्याला दोन तरूणींकडं देऊन पलायन केलेल्या संबंधित महिलेविरोधात भारतीय दंड संहिता कलम 93 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ”या घटनेनंतर बाळाला रुग्णालयात दाखल केलं आहे. बाळ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहे. बाळाची प्रकृती स्थिर आहे,” असं वाशी रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी सांगितलं. पोलिसांनी बाळाच्या आईचा शोध घेण्यासाठी चार शोधपथकं तयार केली आहेत. सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महिलेचा शोध सुरू आहे. ”बाळाच्या आईविषयी कुणाला माहिती असल्यास वाशी रेल्वे पोलीस ठाण्याशी त्वरित संपर्क साधावा,” असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलय.
