ठाणे / महान कार्य वृत्तसेवा
गुन्हे शाखेच्या युनिट 5 पथकानं 1 जूनला अटक केलेले आरोपी विशाल बिपीन सिंह आणि मल्लेश रमेश शेवला यांच्याकडून पोलिसांनी 35 हजार किंमतीचे 10.93 ग्रॅम ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणाची सखोल चौकशी करताना आरोपींनी उत्तराखंडमधून ड्रग्ज मिळवल्याचं माहिती समोर आली होती. आरोपींनी दिलेल्या माहितीवरून गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकानं मागोवा काढत नेपाळला निघालेल्या आरोपींना अटक केली.
पोलिसांनी जप्त केलं 18 लाखांचा कच्चा माल : युनिट 5 च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सखोल चौकशीत आरोपींकडून अधिक माहिती मिळाली. नेपाळला निघालेल्या ओम जयगोविंद गुप्ता उर्फ मोनू ( रा. टनकपुर, उत्तराखंड), भिम सुरेंद्र यादव (रा. नालासोपारा), अमरकुमार लक्ष्मणराम कोहली (21, टनकपुर, उत्तराखंड) या तीन आरोपींना अटक केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून एमडी ड्रग्जची निर्मिती करण्यासाठी लागणारं मशिन आणि विविध रसायनं असा 18 लाख 54 हजार 507 रूपये किंमतीचा कच्चा माल जप्त केला. या कारवाईमुळं एमडी प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या पाचवर गेली आहे. युनिट-5ची धडक कारवाई : आरोपी विशाल आणि मालिश यांनी सखोल चौकशीत दिलेल्या माहितीवरून युनिट 5चं पथक उत्तराखंडमध्ये दाखल झालं. यावेळी त्यांनी सापळा रचून पाळत ठेवली. यावेळी मेलतोडा (ता. देवलथ, पिथोरगढ, उत्तराखंड) इथं एमडी या ड्रग्जची निर्मिती होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी पोलिसांनी तिथं 27 जूनला धाड टाकून एमडी ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारं मशिन आणि विविध रसायनं असा कच्चा माल जप्त केला. त्यानंतर कारखाना चालविणाऱ्या आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी ओम जयगोविंद गुप्ता उर्फ मोनू, भिम सुरेंद्र यादव, अमरकुमार लक्ष्मणराम कोहली हे आरोपी नेपाळला पळून जायच्या तयारीत असताना युनिट 5 च्या अधिकाऱ्यांनी पलिया पोलिसांच्या मदतीनं सियाज इथं चारचाकी वाहनासह 28 जूनला त्यांना ताब्यात घेतलं. आरोपींना ठाणे न्यायालयात नेलं असता आरोपींना 5 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
