जालना / महान कार्य वृत्तसेवा
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आगामी आंदोलन मुंबईतच होणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. मुंबईतील हे आंदोलन आता फक्त मागणीचं नाही, तर निर्णय घेण्यासाठीचं असेल, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आज मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी बैठक बोलावली होती. दुपारी बारा वाजता या बैठकीला सुरुवात झाली. बैठकीसाठी राज्यभरातून मराठा कार्यकर्ते अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले होते. या बैठकीत मराठा आरक्षणासह गेली दोन वर्षे मराठा समाजाला आंदोलन करून काय मिळालं? आणि आता काय मिळवायचं? या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. तसेच 29 ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाच्या नियोजनाबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली.
आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही
या बैठकीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.”आपल्याला रणभूमीत उतरायचं आहे आणि विजयही निश्चित मिळवायचा आहे. रणभूमीची तयारी अशी असली पाहिजे की, यावेळी यश आपलंच असणार,” असे ठाम शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ”आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. मैदान आपणच गाजवायचं असून, विजयाचा गुलालही आपल्या अंगावरच उधळला गेला पाहिजे.” मागील दोन वर्षांपासून मराठा समाजासाठी आंदोलन सुरू असून, आता ही लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. ”ही शेवटची लढाई मराठ्यांनी जिद्दीने आणि एकजुटीने पार पाडली पाहिजे,” असे आवाहनही त्यांनी मराठा बांधवांना केलं.
विजयाची चाहूल लागली मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, 29 ऑगस्टला मुंबईला जायचं आहे. 27 ऑगस्ट रोजी अंतरवालीतून निघायचे आहे. कुठेही न थांबता 28 ऑगस्टला रात्री मुंबईत पोहचायचे आहे. मुंबईतील सर्वच लोकांनी मागे आपली सेवा केली, त्यात परप्रांतीय लोकांनी सुद्धा आपली सेवा केली आहे. पावसाचे दिवस असून मला तुम्ही मुंबईत सोडायला या, पुढचं मी पाहतो. आता अशी संधी पुन्हा मिळणार नसून विजयाची चाहूल लागली आहे, असे त्यांनी म्हटले.
