इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
शहरातील मुख्य शासकीय वैद्यकीय सुविधा असलेल्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सध्या औषध पुरवठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची मोठी हेळसांड होत असून, रुग्णालय प्रशासनालाही उपलब्ध मर्यादित औषधांमधून पुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण या रुग्णालयात तपासणीसाठी येत असतात. विशेषतः हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील तसेच सीमाभागातील गरीब व गरजू रुग्णांसाठी हे रुग्णालय एकमेव आधार आहे. मात्र, सध्या अनेक आवश्यक औषधे साठ्यात नाहीत. यामुळे रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागत असून अनेकजण औषधांअभावी उपचार घेणे टाळत आहेत.
रुग्णालयाला औषधांसाठी वर्षाकाठी सुमारे १ कोटींची आवश्यकता असते. परंतु, शासनाकडून मिळणारा निधी केवळ १३ लाख आहे. अपुऱ्या निधीमुळे रुग्णालयाला आवश्यक औषधे आणि उपकरणे खरेदी करणे शक्य होत नाही. रुग्णालय प्रशासनाने औषधांसाठी जिल्हा प्रशासनाकडे अनेकदा मागणी केली आहे. मात्र, अपुरा निधी उपलब्ध होत असल्याने रुग्णांची गैरसोय सुरूच आहे. औषध खरेदीसाठी निधी कमी मिळतो, टेंडर प्रक्रिया वेळखाऊ असते, त्यामुळे अनेकवेळा औषधांचा तुटवडा निर्माण होतो. यामुळे केवळ डॉक्टर नव्हे तर औषध वाटप करणारे कर्मचारीही अडचणीत आले आहेत.
या परिस्थितीकडे लोकप्रतिनिधी आणि शासनाने तातडीने लक्ष द्यावे. औषध खरेदी प्रक्रियेला गती द्यावी व रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
