सर्वाधिक फटका वस्त्रोद्योगाला ; 100 युनिट पर्यंत वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांना देखील फटका
इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या नवीन ‘मल्टी-इयर टॅरिफ ऑर्डर’मुळे राज्यातील उच्चदाब, लघुदाब उद्योगांसमोर संकट उभे राहणार आहे. प्रति युनिट वीज १ ते १.३० रुपयांनी महाग होणार असल्याची माहिती महाराष्ट्र विज ग्राहक संघटनेने दिली आहे. या दर वाढीमुळे राज्यातील अनेक उद्योग बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दरवाढीचा सर्वाधिक फटका यंत्रमाग उद्योगाला बसणार असल्याचे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे सचिव जावेद मोमीन यानी सांगितले.
जाविद मोमीन म्हणाले की, महाराष्ट्रातील उद्योगांसाठी विजेचा दर वाढणार आहे. इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव, सांगली, विटा, माधवनगर, वडगाव, ठाणे, वाडा, वसई, पालघर, सोलापूर, सांगोला, रुई यांसारख्या प्रमुख यंत्रमाग पट्ट्यांतील उद्योगांना या दरवाढीचा त्वरित आणि थेट परिणाम जाणवेल.
सरकारच्या आवाहनानुसार सौरऊर्जा प्रणाली बसवून आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करणाऱ्या उद्योगांनाही या निर्णयामुळे फटका बसणार आहे. यंत्रमागधारकांना या दरवाढीमुळे वाढीव शुल्क द्यावे लागले. त्यामुळे त्यांचा आर्थिक भार आणखी वाढेल.
वीज ग्राहकांनी विना तक्रार स्मार्ट मीटर बसवून घ्यावे यासाठी चाललेला हा खटाटोप आहे. भविष्यात या स्मार्ट मीटरचे प्रीपेड मीटर ही होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांनी स्मार्टमीटर स्पष्टपणे नाकारावे, प्रस्तावित विज दरवाढी मध्ये मागणी शुल्क, ऊर्जा शुल्क, वहन आकार, वेळेनुसार दरातील बदल, युनिट आणि केव्हीएएच आधारित बिलिंग आणि पॉवर फॅक्टर प्रोत्साहन यांसारख्या बाबींचा समावेश आहे.
- जावेद मोमीन, सचिव–महाराष्ट्र विज ग्राहक संघटना
