कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांना वर्षाला मिळणार 400 कोटी ; इचलकरंजीकरांना 150 कोटींचा लाभ
इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा (विठ्ठल बिरंजे)
जागेच्या कमतरतेमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ऑटोलूम उद्योग उभारणी केलेल्या उद्योजकांना प्रत्येक वर्षाला तब्बल 400 कोटी रुपये व्याज अनुदान रूपाने बूस्टर डोस मिळणार आहे. माजी आमदार सुरेश हळवणकर, प्रकाश आवाडे यांना जमलं नाही. परंतु आमदार डॉ.राहुल आवाडे यांनी प्रत्यक्ष निर्णय करून घेतला. एका इचलकरंजीचा विचार केला तर 150 कोटी रुपयांचा लाभ होणार आहे.
वस्त्रनगरीत रोजगाराच्या निमित्ताने आलेला एकही कामगार उपाशीपोटी झोपणार नाही. यासाठी स्वर्गीय लोकनेते दत्ताजीराव कदम, बाळासाहेब माने, सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे, स्वर्गीय आ. के. एल. मलाबादे यांनी दिलेल योगदान आजही विसरून चालणार नाही. परंतु या कामगारांना रोजची रोटी मिळण्यासाठी येथील उद्योजकांचेही मोलाचे योगदान आहे. हे नाकारून चालणार नाही. परंतु हा उद्योग व्यवसाय सुरळीत कसा राहील, यासाठी शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. शहराचा होत असलेला विस्तार, वाढती लोकसंख्या आणि उद्योग उभारण्यासाठी शहरात जागेची कमतरता यामुळे अनेक उद्योजकांनी परिसरातील ग्रामीण भागात उद्योग उभारले बांधकाम परवानगी घेतली. परंतु शासनाच्या जाचकटीमुळे या उद्योगांना व्याज अनुदान मिळत नव्हते. यासाठी यंत्रमाग धारकांच्या विविध संघटना 2015 पासून पाठपुरावा करत होत्या. माजी आ.सुरेश हाळवणकर, प्रकाश आवाडे यांनीही यासाठी प्रयत्न केले. परंतू, त्यांच्या प्रयत्नांना फारसे यश आलेलं नाही. हे वास्तव आहे.
नुकत्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक प्रश्न घेऊन आ.राहुल आवाडे जनतेसमोर गेले आणि निवडून आल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात त्यांनी शहरातील अनेक प्रश्न प्रामाणिकपणे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. यातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ऑटोलूमसाठी देण्यात येणाऱ्या 5 टक्के व्याज अनुदानाचा, त्यांनी पाठपुरावा करून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय करून घेतला. आणि तब्बल 10 वर्षांची उद्योजकांची प्रतीक्षा संपवली.
या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होईल? हे आज सांगता येत नसली, तरी जिल्ह्यातील 400 उद्योजकांना व्याज अनुदान सवलतीचे वर्षाकाठी 400 कोटी रुपये नक्की मिळणार आहेत. यात तिळमात्र शंका नाही.
काय होती अट
उद्योग उभा करायचा असेल तर तो शहरी भागात असावा ग्रामीण भागात असल्यास व्याज अनुदान सवलत मिळणार नाही. परंतू शहरात जागाच नसल्यामुळे शहरालगतच्या गावांमध्ये उद्योग उभा केले. यासाठी बांधकाम परवाने घेतले परंतु ग्रामपंचायतीचा बांधकाम परवाना ग्राह्य मांनला जात नसल्यामुळे उद्योजकांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. आता या निर्णयामुळे हा परवाना ग्राह्य मानला जाणार आहे.
पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी व्हावी
व्याज अनुदानासाठी यंत्रमाग धारकांचा दीर्घकाळ लढा सुरू आहे. शासनाने जरी आता निर्णय घेतला असा तरी याची अंमलबजावणी आमची मागणी असल्यापासून म्हणजे 2015 पासून पूर्वलक्षी प्रभावाने करावी. अशी अपेक्षा यंत्रमाग धारकांची आहे. ही अंमलबजावणी झाली तर वर्षाला 400 म्हणजे 10 वर्षाचे किमान 4 हजार कोटी एका कोल्हापूर जिल्ह्याला मिळू शकतात.
ऐतिहासिक निर्णय
ग्रामीण भागात उद्योग उभा केलेल्या ऑटोलोम धारकांसाठी तेथील ग्रामपंचायतचा बांधकाम परवाना ग्राह्य धरून व्याज अनुदान द्यावे. यासाठी पाठपुरावा सुरू होता. परंतु अटी जाचकतेमुळे निर्णय होत नव्हता. आ.डॉ.राहुल आवाडे यांनी यासंदर्भात आग्रही भूमिका घेऊन हा प्रश्न मार्गी लावला हा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल.
- विनय महाजन, अध्यक्ष–यंत्रमाग धारक जागृती संघटना
