मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
हिंदी सक्तीविरोधात 5 जुलै रोजी मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे. या मोर्चाचे खास आकर्षण म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू या मोर्चात एकत्र दिसणार आहेत. या मोर्चाच्या निमित्ताने नियोजनासाठी सध्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते यांच्या भेटीगाठी वाढल्या असून, हे दोन भाऊ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील एकत्र पाहायला मिळणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. या मोर्चाला आता शरद पवार यांनीदेखील पाठिंबा दिला असून, याबाबत खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे.
मोर्चाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीदेखील पाठिंबा : पाच जुलै रोजी होणाऱ्या मुंबईतील हिंदी सक्तीविरोधातील मोर्चाबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, ”राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनीही स्वतंत्र मोर्चे जाहीर केले होते. आता शनिवारी पाच तारखेला एकत्रित मोर्चा निघेल. या मोर्चाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीदेखील पाठिंबा दिला आहे. काल शरद पवार यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांनी सागितलं, आमचा पक्ष या मोर्चामध्ये सहभागी होईल. मी येण्याचा प्रयत्न करेन, पण माझे सर्व कार्यकर्ते या मोर्चाला उपस्थित राहतील. तशा मी सूचना दिल्या आहेत. काँग्रेस पक्षदेखील या हिंदी सक्तीच्या विरोधात आहे. मला खात्री आहे की, काँग्रेसचे कार्यकर्ते देखील या मोर्चात सहभागी होतील,” असंही ते म्हणालेत.
5 जुलैच्या ऐतिहासिक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन : ”महाविकास आघाडीत इतर अनेक घटक पक्ष आहेत. संघटना आहेत. या सगळ्यांनी 5 जुलैच्या ऐतिहासिक मोर्चाला पाठिंबा जाहीर केलाय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन प्रमुख नेते एकत्र येऊन या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. याचा आनंद सगळ्यांना आहे आणि याचा आनंद बहुतेक सर्वांनी जाहीरपणे व्यक्त केलाय. मोर्चाची वेळ सकाळी दहा वाजता आहे. त्याच्यावर आम्ही चर्चा करू. पूर्वी एक काळ असा होता हे सर्व लोक एकमेकांना भेटण्याचे टाळत होते. किंबहुना रस्तेदेखील बदलत होते. आता एकत्र भेटतात, एखाद्या चहा पितात, एकत्र गप्पा मारताना व्हिडीओ शेअर करत आहेत,” असंही संजय राऊतांनी अधोरेखित केलंय.
मराठी माणूस विखुरला जावा, अशी भाजपाची इच्छा : ”मुंबईवर जर मराठी माणसाचा झेंडा सातत्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली फडकलेला आहे. मराठी माणूस विखुरला जावा, अशी भारतीय जनता पक्ष आणि खास करून अमित शाह यांची भूमिका आहे. आपण त्या भूमिकेला छेद देण्यासाठी एकत्र येऊ यात ही भूमिका आम्ही अनेकदा जाहीर केली आहे. राज ठाकरे यांनीसुद्धा जाहीर केली आहे. उद्याचा मोर्चा आटोपल्यावर एक चांगलं वातावरण निर्माण होईल. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मनाप्रमाणे नक्कीच चांगलं घडेल. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी किती आदळआपट केली तरी मराठी माणसाची एकजूट फुटणार नाही. आपण ज्या पद्धतीने मोर्चाला बदनाम करीत आहात, उद्धव ठाकरे यांच्याबाबत चुकीची विधान करीत आहात, ती पूर्णपणे गैरसमज पसरवणारी आहेत,” असे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.
समिती नेमणं गुन्हा आहे का? : राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तीन भाषांचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना स्वीकारण्याचा आरोप सध्या महायुतीतील नेत्यांकडून केला जातोय. त्याला उत्तर देताना राऊत म्हणाले की, ”समिती नेमणं गुन्हा आहे का? एखाद्या जटील विषयाचा अभ्यास करण्यासाठी, जो जटील विषय केंद्राने आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला, तो विषय नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी लादला. केंद्रीय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आम्ही तयार केले नाही. ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह जे देवेंद्र फडणवीस यांचे पिताजी वर बसले आहेत, त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लादलंय. केंद्राने एखादा विषय लादल्यावर उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलेला नाही, त्यासाठी रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या ज्येष्ठ अशा व्यक्तींची त्यांनी नेमणूक केली आणि त्यानंतर हा अहवाल दिला. कोणताही अहवाल मुख्यमंत्री स्वीकारतात. त्यांनी स्वीकारल्यावर लगेच जीआर काढला का? तो जीआर देवेंद्र फडणवीस यांनी काढला,” असंही संजय राऊत म्हणाले.
तीन वर्षांत तुम्ही काय केलं? : राऊत पुढे म्हणाले की, ”राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात स्थापन केलेल्या डॉ. रघुनाथ माशेलकर कार्य समिती गटाचा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आलाय. त्यानंतर आतापर्यंत त्यामध्ये तीन वर्षे गेली. तीन वर्षांत तुम्ही काय केलं? आता पुन्हा एकदा केंद्राने म्हणजे आरएसएसने दबाव आणल्यावर तुम्ही धावपळ करीत आहात. हा अहवाल गोडाऊनमध्येच पडला होता. देवेंद्र फडणवीस सारासार खोटं बोलत आहेत. ते या मुद्द्याचं राजकारण करीत आहेत. महाराष्ट्रात हिंदी सक्ती करावी, हिंदी लादावी आणि मराठीचा मुडदा पडावा, असा त्यांच्यावर केंद्र सरकारचा दबाव आहे. हा दबाव उद्धव ठाकरे यांनी झिडकारला होता. उद्धव ठाकरे यांनी कोणता आदेश काढला नाही, जीआर काढला नाही. हा जीआर देवेंद्र फडणवीस यांनी काढल्यामुळे त्या जीआरची उद्या आम्ही होळी करीत आहोत. हा उद्धव ठाकरे सरकारचा जीआर नाही,” असंही संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं.
