Spread the love

मिरज / महान कार्य वृत्तसेवा

मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील म्हैशाळ बंधारा केदारनाथ मंदिराजवळ कृष्णा नदीच्या मध्यभागी वाहत्या पाण्यात आज (२६ जून) सकाळी १० च्या सुमारास एका महिलेचा मृतदेह आढळून आला. मृत महिलेचे नाव दिपाली अमित खांडेकर (वय ३५, रा.मालगाव) असे आहे. ती मागील १२ दिवसांपासून बेपत्ता होती. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची नोंद झाली होती.

घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, हेड कॉन्स्टेबल मधुकर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले. पथकातील कैलास वडर, सचिन माळी, असिफ मकानदार, आकाश कोलप, अमीर नदाफ, शिवराज टाकळे यांनी मृतदेह बाहेर काढून तो पुढील तपासासाठी मिरज ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

दिपाली खांडेकर व तिची मुलगी दोघीही मिसिंग असल्याची नोंद १२ दिवसांपूर्वी करण्यात आली होती. आज आढळलेला मृतदेह दिपाली यांचा असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी ओळखून सांगितले. मात्र तिची मुलगी अद्यापही बेपत्ता असून, तिचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत.