Spread the love

शिवनेरी कॉलनी मध्ये नागरी सुविधांची वाणवा

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा (प्रविण पवार)

इचलकरंजी येथील प्रशासकीय वार्ड क्रमांक 23 मधील शिवनेरी कॉलनी मध्ये नागरी सुविधांची वाणवा आहे. या ठिकाणी असणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली असून, सदर रस्त्यावरून चालत जाताना नागरिक घसरून पडत आहेत. तर स्वतःची वाहने रस्त्याच्या कडेला दुसऱ्याच्या जागेत लावण्याची वेळ आली आहे. घरामध्ये घेतलेले वीज कनेक्शन साध्या पाईपवरून टाकले आहे. गटारी नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या उभ्या रस्त्यावरून जाताना नागरिक मात्र आडवे होताना दिसत आहेत.

तारदाळ, इचलकरंजी च्या सीमेवर इचलकरंजी महानगरपालिकेचा प्रशासकीय वार्ड क्रमांक 23 आहे या वार्डामध्ये शिवनेरी कॉलनी मध्ये नागरी सुविधाचा अभाव दिसत आहे. या ठिकाणी आल्यानंतर एखाद्या दुर्गम भागात राहत असल्याचा अनुभव येथील नागरिकांना होत आहे. सदर कॉलनीमध्ये एकूण तीन गल्या असून पहिल्या गल्लीमध्ये डांबरी रस्ता करण्यात आला आहे.

गटर करण्यात आले असून ती अपुरी आहे. तर गल्ली नंबर दोन व तीन मध्ये कोणत्याही प्रकारची नागरी सुविधा महापालिकेकडून पुरवण्यात आलेली नाही. आरोग्य विभागाचे कर्मचारी तर फिरकत ही  नाहीत साफसफाईचा ठेका खाजगी मक्तेदाराला दिल्याने अद्याप पर्यंत त्या मक्तेदाराचा कर्मचारी सदर भागात साफसफाईसाठी आलेला नागरिकांनी पाहिला नाही. सदर वस्ती मधील रस्ते मंजूर आहेत.

विजेचे काम टाकण्याचे ही काम मंजूर असल्याबाबत सांगितले जात आहे. परंतु गेले वर्षभर झाले सदर कामास सुरुवात झाली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिक घराकडे जाताना निसरड्या रस्त्यावरून पाय घसरून पडताना पहावे लागत आहे. यामध्ये काही जण जायबंदी ही झाले आहेत. सध्या महापालिकेचा कारभार  प्रशासकाच्या हाती आहे. त्यामुळे निवडणूक लागण्याची शक्यता दिवसेंदिवस लांबतच  असल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी ही या भागात फिरकताना दिसत नाहीत. त्यामुळे दाद मागायची कोणाकडे हा प्रश्न येतील नागरिकांना सतावत असून महापालिका आयुक्त यांनी तातडीने सदर भागास भेट देऊन या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी मागणी शिवनेरी कॉलनीतील नागरिकांमधून होत आहे.