इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
दारुचे पैसे देण्यावरुन झालेल्या वादातून कटरने वार करुन सुरज शंकर बागडे (वय 34 रा.भाटले मळा) याला जखमी केल्याप्रकरणी दोषी ठरवत येथील अपर व जिल्हा सत्र न्यायाधीश एम.ए.भोसले यांनी प्रकाश शंकर गुरव (वय 62 रा.शाहूनगर चंदूर) याला आ जन्म (जन्मठेप) कारावास आणि एक हजार रुपये दंड आणि दंड न भरलेस तीन दिवसाचा साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड.एच.आर.सावंत-भोसले यांनी काम पाहिले.
या घटनेची पार्श्वभूमी अशी, सुरज बागडे व प्रकाश गुरव हे दोघे एकमेकाच्या ओळखीचे आहेत. ते दोघेही दारु पिण्यासाठी एकत्र जात होते. 15 डिसेंबर 2021 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शहापूर रोडवर पेट्रोल पंपाजवळ दारु पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी बागडे याने गुरव याला पैसे देण्यास सांगितले. त्यावरुन दोघात वाद निर्माण होऊन गुरव याने शिवीगाळ केली. त्यावर बागडे हा शिव्या देऊ नको असे म्हणत असतानाच गुरव याने खिशातून कटर काढत बागडे याच्या डाव्या बाजूच्या गळ्यावर वार केल्याने बागडे हा जखमी झाला होता.
या प्रकरणी शहापूर पोलिसात बागडे याच्या फिर्यादीवरुन गुरव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी येथील अपर व जिल्हा सत्र न्यायालयात होऊन सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये सरकार पक्षातर्फे ॲड.एच.आर.सावंत-भोसले यांनी मांडलेला युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने गुरुव यास दोषी ठरविले. आणि भादंविस कलम 307 अन्वये आजन्म (जन्मठेप) कारावासाची तसेच 1 हजार रुपये दंड व दंड न दिल्यास तीन दिवसांचा साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली.
