इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
बंदी आदेशाचे उल्लंघन करत विनापरवाना देशी बनावटीचे मॅगझिनसह गावठी पिस्तुल व 4 जिवंत काडतुस जवळ बाळगल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अंकित सुभाषचंद्र केसरवाणी (वय 29 रा.योगायोगनगर) याला अटक केली आहे. त्याच्याकडून 64 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, इचलकरंजी-चंदूर रोडवरील अलायन्स हॉस्पिटल चौक परिसरात योगायोगनगर गल्ली नं.1 येथे राहणारा अंकित केसरवाणी याने गावठी पिस्तुल जवळ बाळगले असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अलायन्स हॉस्पिटल चौक परिसरात त्याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे मॅगझिनसह एक देशी बनावटीचे गावठी पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे मिळून आली. त्याची बाजारभावानुसार 64 हजार रुपये किंमत असून पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करुन केसरवाणी याला अटक केली आहे. या प्रकरणी पो. कॉ. सुनिल बाईत यांनी फिर्याद दिली आहे.
ही कारवाई पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक संभाजी भोस्कर, सहा.फौजदार रावसाहेब कसेकर, पोलिस कॉन्स्टेबल सुनिल बाईत, सद्दाम सनदी, सुकुमार बरगाले, अरविंद माने, पवन गुरव यांच्या पथकाने केली.
