पेठवडगांव / महान कार्य वृत्तसेवा
पेठवडगाव येथील आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनि.कॉलेज पेठ वडगाव मध्ये राजर्षी शाहू महाराजांची १५१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी इयत्ता दहावीचा विद्यार्थी आयुष पोरे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी महाराजांच्या कार्यावर आधारित मंत्रमुग्ध करणारा पोवाडा आणि विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित परिपाठ सादर केला.
“राजर्षी शाहू महाराजांचे विचार प्रत्येक विद्यार्थ्यांनी आत्मसात करून आपल्या आयुष्याची वाटचाल केली पाहिजे” असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगांची आठवण करून दिली. यामध्ये खासबाग मैदानाची उभारणी, जयसिंगपूर शहराची स्थापना, जातीभेद, शिक्षण प्रसार, आंतरजातीय विवाह, वस्तीगृहाची स्थापना, किर्लोस्कर उद्योग समूह अशा विविध प्रसंगांच्या माध्यमातून शाहू महाराजांचे कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले.
अध्यक्षीय मनोगत विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.डी.एस.घुगरे यांनी व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की आपले विद्यालय खऱ्या अर्थाने शाहू महाराजांच्या विचाराप्रमाणे कार्य करत आहे, याचा अभिमान आपल्या सर्वांना नक्कीच आहे आणि शाहू महाराजांच्या विचाराप्रमाणे आपण वाटचाल करून आपल व्यक्तिमत्व सुंदर बनवल पाहिजे.
यावेळेस संस्थेच्या सचिव तथा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.एम.डी.घुगरे, ग्रीन व्हॅली मुख्याध्यापक व्ही.एस.डोईजड, विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.जी.जाधव, प्रशासक एम.एच.चौगुले तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
