हजारो शाहूभक्तांच्या गर्दीच्या साक्षीने उत्साही वातावरणात शाहू जयंती सोहळा
राधानगरी / महान कार्य वृत्तसेवा
छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टीने राधानगरी धरण उभारण्याचे उत्तुंग कार्य केले. त्यामुळे हे स्थळ जनक घराणे म्हणून आमच्यासह सर्वांनाच विधायक समाजकार्यासाठी ऊर्जास्थळ आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या अथांग कार्याचे प्रतिक असलेल्या त्यांनी उभारलेल्या धरणस्थळी त्यांच्या १५१ व्या जयंतीवेळी आयोजित कार्यक्रमवेळी ते बोलत होते. त्यांच्यासह राजे बँकेच्या अध्यक्षा सौ.नवोदितादेवी घाटगे व राधानगरी परिसरातील बारा बलुतेदार जोडप्यांच्या हस्ते धरणातील जलपूजन करून वाद्यांच्या गजरात त्यांनी जलकलश जयंतीस्थळापर्यंत आणले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास मंत्रोच्चारात विधीवत जलाभिषेक घातला. छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. हजारो शाहूभक्तांच्या गर्दीच्या साक्षीने भरपावसात उत्साही वातावरणात हा जयंती सोहळा साजरा झाला.
श्री.घाटगे पुढे म्हणाले, राधानगरीकरांच्या त्यागातून या ऐतिहासिक धरणाची निर्मिती झाली. त्यामुळे संपूर्ण जिल्हा सुजलाम-सुफलाम झाला. या त्यागाची परतफेड या ठिकाणी पर्यटन स्थळ विकसित करून करूया. येत्या काळात शाहूप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागातून शाहू जयंती यापेक्षा मोठ्या प्रमाणात साजरी करूया. त्या माध्यमातून राजर्षींचे कार्य व विचार युवा पिढीसमोर येऊन त्यांना प्रेरणादायी ठरतील.
दरम्यान, निगवेतील शिवछत्रपती मर्दानी आखाड्याच्या पथकाने मर्दानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिकानी उपस्थितांची मने जिंकली. संभाजी आरडे स्वागत यांनी केले. विलास रणदिवे यांनी आभार मानले.
…आणि समरजितराजेंनी राधानगरीकरांची मागितली माफी
गत जयंतीवेळी घाटगे यांनी पुढील जयंतीला मी आमदारकीचा गुलाल घेऊनच येणार असा शब्द राधानगरीकरांना दिला होता. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना अल्प मतात गुलालाने हुलकावणी दिली. त्याबद्दल घाटगे यांनी प्रांजळपणे राधानगरीकरांची माफी मागितली व छत्रपती शाहू महाराजांनासुद्धा विधायक कामासाठी संघर्ष करावा लागला. त्याप्रमाणे हा शब्द पाळण्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला, तरी मी कटीबद्ध आहे. असा विश्वास त्यांनी राधानगरीकरांना दिला.
