Spread the love

कोल्हापूर जिल्ह्याचा नाहीतर बारा जिल्ह्यांचा प्रश्न, सतेज पाटलांचाही हल्लाबोल

कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा

विधानसभा निवडणुकीपूर्वी संभाव्य धोका लक्षात घेत महायुती सरकारने शक्तीपीठ महामार्ग गुंडाळून टाकला होता. मात्र, सत्तेवर येताच पुन्हा एकदा सरकारने शक्तिपीठ महामार्गासाठी आपली शक्ती पणाला लावली आहे. मात्र, दुसऱ्या बाजूने सुद्धा शेतकऱ्यांनी आणि शेतकरी नेत्यांनी या शक्तिपीठ महामार्ग विरोधात एल्गार पुकारला आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गासाठी शेती मोजण्याचा प्रयत्न केला जात आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होत आहे. काल सांगलीमध्ये शेतकऱ्यांनी तगडा पोलिस बंदोबस्त झुगारून शेतात झोपून विरोध केला. आता धाराशिवमध्ये सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी बांधावर पोहोचणार आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना धाराशीमध्ये या मोहिमेविरोधात पाठिंबा देण्याची विनंती केली. राजू शेट्टी आणि थेट बांधावर जाऊन मोजणी बंद करणार आहेत.

आज 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक

दुसरीकडे, या शक्तीपीठ महामार्गावरून आमदार सतेज पाटील यांनी सुद्धा हल्लाबोल केला आहे. सतेज पाटील म्हणाले की, शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची भूमिका तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. आता, मात्र ही घोषणा मतांसाठी होती का? असा प्रश्न जनतेला पडला असल्याचे ते म्हणाले. गरज नसलेला हा महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारू नका, असे पाटील यांनी सांगितले. आज 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक ऑनलाईन घेणार आहोत. यामध्ये पुढील रणनीती ठरवून महाविकास आघाडी म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हे सरकार कॉन्ट्रॅक्टर धार्जिण असल्याचा हल्लाबोल सुद्धा पाटलांनी केला.

हा केवळ कोल्हापूर जिल्ह्याचा प्रश्न नसून बारा जिल्ह्याचा प्रश्न

त्यांनी पुढे सांगितले की निवडणुकीपूर्वी कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग होणार नाही यादी अधिसूचना निघाली होती. ती रद्द करून पुन्हा काढली अशी माहिती आहे. हा केवळ कोल्हापूर जिल्ह्याचा प्रश्न नसून बारा जिल्ह्याचा प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान हसन मुश्रीफ आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मंत्रिमंडळातील भूमिकेवर सतेज  पाटील यांनी साशंकता व्यक्त केली. कॅबिनेट बैठकीत त्यांनी विरोध दर्शवला की नाराजी दर्शवली याबाबत आम्हाला माहिती नाही. मात्र, त्यांची भूमिका स्पष्ट होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितलं. महायुतीमध्ये दोन्ही पक्षांची हातबलता असल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावला. ते म्हणाले की, अनेक मंत्री एकमेकांविरुद्ध बोलताना दिसत आहेत.