Spread the love

अर्ध्या तासापासून शिवतीर्थावर ‘क्लास’; हिंदी सक्तीवरील वाद शमणार?

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

राज्यातील शालेय शिक्षणात ‘त्रिभाषा सूत्रा’नुसार पहिलीपासून हिंदींच्या अंमलबजावणीवरून सुरू असलेल्या वादात आज निर्णायक टप्पा येण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले आहेत. हिंदी सक्तीबाबत दादा भुसे राज ठाकरेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. भुसेंसह शिक्षण खात्यातील सर्व अधिकारी राज ठाकरेंना हिंदी भाषा सक्तीबाबत माहिती देणार आहेत. दादा भुसे आणि राज ठाकरे यांच्यात अर्ध्या तासापासून चर्चा सुरु आहे. त्यामुळे राज ठाकरेंची समजूत काढण्यात दादा भुसे यांना यश मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा तिसऱ्या पर्यायी भाषेच्या रूपात शिकवण्याचा निर्णय घेतला गेल्याने मराठीप्रेमी नागरिक, शिक्षणतज्ज्ञ, संस्था, संघटना आणि विविध राजकीय पक्षांनी याला तीव्र विरोध दर्शवला होता. या मुद्द्‌‍यावर मनसेने आक्रमक भूमिका घेत ‘हिंदी भाषा लादू नका’ असा थेट इशारा देत आंदोलनाचा इशाराही दिला होता. राज्यभरातून या निर्णयाविरोधात संताप व्यक्त होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संबंधित तज्ज्ञांशी सल्लामसलत करूनच पुढील निर्णय घ्यावेत, अशा सूचना दिल्या होत्या.

यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची समजूत काढण्यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसे हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये अर्ध्या तासापासून चर्चा सुरु आहे. दादा भुसे यांनी राज ठाकरे घरी पोहोचण्याआधी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागाच्या माध्यमातून जी काही भूमिका घेतलेली आहे, ती भूमिकेत काय काय मुद्दे आहेत हे आम्ही राज ठाकरे यांच्यासमोर ठेवणार आहोत. त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांचे काही मुद्दे असतील, त्या मुद्द्‌‍यांवर शासनाची काय बाजू आहे ती त्यांच्यासमोर आम्ही ठेवू. मला विश्वास आहे की, चर्चा सकारात्मक होईल. त्यांच्या काही सूचना असतील तर निश्चितपणे आम्ही त्याचे स्वागत करून असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सोबत चर्चेनंतर हिंदी सक्तीवरील वाद शमणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.