तो सामान्य जनतेमुळेच मिळालाय ; रोहिणी खडसे बबनराव लोणीकरांवर भडकल्या
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर सरकार आणि स्वत:च्या विरोधात टीका करणाऱ्या तरुणांविषयी त्यांनी भाषणादरम्यान तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. ”कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधभक्त म्हणतात,” असे म्हणत त्यांनी टीकाकारांवर निशाणा साधला. याच कूचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाचे पेन्शन बबनराव लोणकर यांनीच केलं आहे. नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये दिले, असे त्यांनी म्हटले. बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी बबनराव लोणीकर यांच्यावर निशाणा साधलाय.
रोहिणी खडसे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, सोशल मीडियावर आपल्या विरोधात व्यक्त होणाऱ्या तरुणांविषयी भाजपचे आमदार लोणीकर बघा कसे बोलत आहेत. ही या लोकांची भाषा, त्यांचा अहंकार, त्यांची संस्कृती आहे. आमदार महोदय, तुमचे शेठ जो 25 लाखांचा सूट घालतात तो सामान्य जनतेमुळे मिळाला आहे. लाखो रुपयांचा गॉगल घालतात ती सामान्य जनतेची देण आहे. इतकेच काय तुम्ही राहता तो बंगला, फिरवता ती गाडी जे काही मिळालंय ते जनतेच्या आशीर्वादाने मिळाले आहे, त्या मुलांच्या आईबापांमुळे मिळाले आहे. एवढा माज बरा नव्हं लोणीकर! हीच जनता लोण्याचे तूपही करू शकते हे लक्षात असू द्या, असे म्हणत त्यांनी बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केलाय.
आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटलं होतं की, ”ते कुचकळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे, त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार पंतप्रधान मोदी यांनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले आहेत. तुझ्या पायातील बूट अथवा चप्पल आमच्यामुळेच आहेत. तुझ्या हातातलं डबडं, तो देखील आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो. आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का? आमचं घेऊन आमच्याबद्दल लिहितोस का?”, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते.
