जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा
चार महिन्यात होऊ घातलेली जयसिंगपूर नगरपरिषदेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवण्याची घोषणा करीत सर्वसामान्यांच्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी मिळणार असून शिवसैनिकांनी तयारीस लागावे, असे मत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी व्यक्त केले.
नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यालयात बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. जिल्हाप्रमुख माने पुढे म्हणाले, जयसिंगपूर नगरपालिकेसाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्वच निवडणुकीसाठी सामोरे जाण्याचे ठरवले आहे.
यावेळी सर्वांमते शिवसेना पक्षाच्या समन्वयक पदी माजी नगरसेवक पराग पाटील यांची निवड करण्यात आली. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे यापुढील महायुतीतील सर्व पक्षाशीं चर्चा करुन एकत्र निवडणूक लढविण्याचे आदेश आहेत. त्या पद्धतीने महायुतीतील कार्यकर्त्यांनी तयारीस लागावे, अशा सूचना दिल्या.
या बैठकीस शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख सतिश मलमे, शिरोळ तालुका प्रमुख उदय झुटाळ, वैद्यकीय कक्ष तालुकाप्रमुख सचिन डोंगरे, तालुका उपप्रमुख सुरज भोसले, युवा सेना तालुकाप्रमुख आकाश शिंगाडे, महिला आघाडी तालुकाप्रमुख अर्चना भोजणे, कार्याध्यक्ष स्वाती भापकर, शहर प्रमुख प्रियांका धुमाळे, समन्वयक राणी तिवडे, उपशहर प्रमुख रोहिणी सांबरेकर, रणवीर शिंदे, राहुल शिंदे उपस्थित होते.
