Spread the love

वाशिम / महान कार्य वृत्तसेवा

अघ्श्घ्शब च्या एका मेळाव्यासाठी वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे आले असता माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वारकऱ्यांविषयी अबू आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. इम्तियाज जलील म्हणाले, ‘तो वेडा माणूस आहे. आधी काहीही बोलतो आणि नंतर माफी मागतो. अशा अनावश्यक विषयांना हात घालून दोन समाजांमध्ये दरी निर्माण करण्याचे काम करतो’.

अबू आझमी यांचे विधान एका सामान्य मुस्लिमाचे मत नाही, असे सांगत इम्तियाज जलील म्हणाले. अबू आझमी सारख्या मूर्ख व्यक्तीचे ते वैयक्तिक मत आहे. अशा वेळी अधिवेशनाच्या तोंडावर, मुद्दामून असे अनपेक्षित वक्तव्य करून लोकांचे लक्ष मुख्य समस्यांवरून हटवण्याचा प्रयत्न केला जातो. मागच्या वेळीही औरंगजेबाचा मुद्दा उपस्थित करून असेच केले गेले होते.

यासोबतच इम्तियाज जलील यांनी आरोप केला की, अबू आझमी स्वत: बोलत नाही, तर त्यांचे बोलवते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे इतर नेते आहेत. अबू आझमी यांना सल्ला देताना  इम्तियाज जलील म्हणाले, जर विषयाचा अभ्यास नसेल आणि बोलता येत नसेल, तर कृपया गप्प बसा.

काय म्हणाले होते अबू आझमी?

आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं लवकर जावा अन्यथा वारीच्या पालख्यामुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही पण नमाजसाठी तक्रार होते असे अबू आझमी म्हणाले. याचा अर्थ जाणीवपूर्वक काही लोक मुस्लिम बाबतीत हे करत आहेत, असं वक्तव्य अबू आझमी यांनी केले आहे.

अबू आझमी यांनी पंढरपूर वारी पालखीबाबत केलेल्या विधानावरून राजकारण तापलं होतं. त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली होती. भाजपसह इतर पक्षांच्या नेत्यांनीही अबू आझमी यांच्या विधानावर टीका करत त्याला सांप्रदायिक मुद्दा बनवला होता. यानंतर सपाचे आमदार अबू आझमी यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे.

अबू आझमी यांनी मागितली माफी सोलापूरमध्ये मी केलेल्या एका वक्तव्यामुळे पसरलेल्या गैरसमजुतीबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. माझं वक्तव्य तोडून मोडून आणि दुर्भावनापूर्ण पद्धतीने सादर करण्यात आले आहे. जर माझ्या वक्तव्यामुळे वारकरी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द पूर्णपणे मागे घेतो आणि सर्वांची माफी मागतो. माझा हेतू कधीही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता, असं अबू आझमी म्हणाले.